Donald Trump Iran Deadline News: डोनाल्ड ट्रम्प यांच्या थेट धमकीमुळे मध्यपूर्वेतील संघर्ष अधिक चिघळण्याची भीती वाढली आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमला इराण जुमानते का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शांतता चर्चेतून तोडगा निघण्यापेक्षा चर्चा फिसकटण्याची अधिक शक्यता असताना या संघर्षाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात ४५ दिवसांच्या शस्त्रसंधीसाठी प्रयत्न सुरु आहेत. हे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता कमी असली तरी सध्या जोरदार वाटाघाटी सुरु असल्याची गुप्त माहिती ‘ॲक्सिऑस’ला मिळाली आहे.
तोडगा काढण्यासाठी अखेरची संधी
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटममुळे या चर्चेला यश मिळण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे या विषयाशी निगडीत अधिकाऱ्यांनी ‘ॲक्सिऑस’ला सांगितले. पण, संघर्ष अधिक चिघळण्यापूर्वी त्यावर तोडगा काढण्याची ही अखेरची संधी असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. ट्रम्प यांनी इराणमधील पायाभूत सुविधांना गंभीर नुकसान पोहोचविण्याचा इशारा दिला आहे. प्रत्त्युत्तरदाखल इराण आखाती देशातील उर्जा निर्मिती केंद्र आणि पाणी पुरवठा केंद्रांना लक्ष्य करण्याची दाट शक्यता आहे.
ट्रम्प यांचा इशारा
इराणने अमेरिकेच्या अटी मान्य करुन होर्मुझ खुली करावी, अशी मागणी ट्रम्प यांनी केली होती. यासाठी ट्रम्प यांनी इराणसमोर सोमवारपर्यंत अखेरची मुदत दिली होती. पण, ही मुदत २० तासांनी वाढविण्यात आली आहे. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य न केल्यास गंभीर स्वरुपातील हल्ले करण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, ट्रम्प यांनी सध्या चर्चा आणि तडजोड सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले. पण, या चर्चा फिसकटल्यास यापेक्षा भयंकर लष्करी कारवाई करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
चर्चा निष्फळ ठरल्यास?
ट्रम्प यांनी नुकतेच वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत इराणाला गंभीर इशारा दिला. त्यांनी यावेळी गोष्टी मान्य न केल्यास, होर्मुझ बंद ठेवण्याचाच निर्णय घेतल्यास. त्यांना त्यांच्या देशातील प्रत्येक पॉवर प्लांट आणि इतर प्रकल्पही गमवावे लागतील. ट्रम्प यांनी इराणला होर्मुझ खुली करण्यासाठी ४८ तासांची मुभा दिली आहे. तसे न केल्यास इराणवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करण्याचा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.
४५ दिवसांची युद्धबंदी होणार?
पाकिस्तान, इजिप्त आणि तुर्कियेमार्फत मध्यस्थीचे प्रयत्न केले जात आहेत, त्याचबरोबर ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांच्यात थेट संदेशांची देवाणघेवाणही होत आहे. दरम्यान, सध्याच्या चर्चेत असलेल्या आराखड्यात दोन टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात ४५ दिवसांची युद्धबंदी लागू केली जाईल. तर, दुसऱ्या टप्प्याचे उद्दिष्ट युद्ध पूर्णपणे संपवण्यासाठी व्यापक चर्चा केली जाणार आहे. पण, होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे खुली करणे, इराणच्या अतिसंवर्धित युरेनियमचा साठा यावरुन अद्याप मतभेद असल्याचे मध्यस्थींचे मत आहे.
