Donald Trump addresses the Hormuz Strait fuel crisis and military tension with Iran : मध्यपूर्वेतील संघर्षामुळे इंधनाचा तुटवडा सहन करावा लागत असलेल्या देशांकडे आता फक्त दोनच पर्याय उरले आहेत, एकतर अमेरिकेकडून इंधन खरेदी करा किंवा इराणने नाकेबंदी केलेल्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून पुढाकार घेऊन स्वतःच्या हिमतीवर तेल मिळवा, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मंगळवारी म्हणाले आहेत. यावेळी ट्रम्प यांनी इराणविरोधातील युद्धात सहभागी होण्याच्या त्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष करणाऱ्या मित्रराष्ट्रांवर यावेळी टीका केली आहे. या देशांनी आता स्वत:साठी लढायला शिकले पाहिजे, अमेरिका नेहमीच त्यांच्या मदतीला येणार नाही, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
“ज्या देशांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमुळे जेट इंधन मिळत नाहीये, जसे की युनायटेड किंगडम सारखे देश, ज्यांनी इराणविरोधातील मोहिमेत सहभागी होण्यास नकार दिला, त्यांच्यासाठी माझ्याकडे काही सूचना आहेत: पहिली म्हणजे, अमेरिकेकडून (इंधन) विकत घ्या, आमच्याकडे ते भरपूर आहे, आणि दुसरी म्हणजे, काही काळाने का होईना धाडस गोळा करा, सामुद्रधुनीत जा आणि ते घ्या,” असे ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणविरोधात संयुक्त लष्करी मोहिम सुरू केल्यानंतर, इराणने प्रत्युत्तर म्हणून होर्मुझची सामुद्रधुनी रोखली आहे. जागतिक तेल पुरवठ्यापैकी सुमारे २० टक्के तेल हे या या समुद्री मार्गाने वाहून नेले जाते. त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा सागरी मार्ग बंद झाल्याने जगभरात इंधनाचा तुटवडा जाणवत आहे. तसेच यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून, पूर्वी ७५ डॉलर्स प्रति बॅरल असलेले तेल आता १०० डॉलर्सच्या पुढे गेले आहे.
इराणला वेगवेगळ्या धमक्या आणि इशारे देऊनही डोनाल्ड ट्रम्प हे अद्यापही ही सामुद्रधुनी खुली करू शकलेले नाहीत. ट्रम्प यांनी मित्र देशांना हा समुद्री मार्ग सुरक्षित ठेवण्यासाठी येथे युद्धनौका तैनात करण्याचे आवाहन देखील केले होते. मात्र कोणत्याही बड्या मित्र राष्ट्राने ट्रम्प यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने ज्यांना फटका बसला आहे त्या देशांनी स्वतःचे रक्षण त्यांनाच करावे लागेल असेही सुनावले आहे. “तुम्हाला आता स्वतःसाठी लढायला शिकावे लागेल” आणि “अमेरिका यापुढे तुमची मदत करण्यासाठी तिथे नसेल, जसे तुम्ही आमच्यासाठी तेथे नव्हतात,” असे ट्रम्प म्हणाले आहेत.
इराणचे पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असता असा दावा करत, ट्रम्प यांनी, “सर्वात कठीण काम आता संपले आहे. जा आणि तुमचे स्वत:चे तेल स्वतः मिळवा,” असे आवाहन इतर देशांना केले आहे.
इराणच्या संसदेतील एक महत्त्वाच्या समितीने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर कर आकारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्याचे वृत्त समोर आले आहे. याद्वारे अमेरिका आणि इस्रायलशी संबंधित जहाजांवर कडक निर्बंध लादण्याची आणि इराणवर एकतर्फी निर्बंध लादणाऱ्या देशांच्या जहाजांना या महत्त्वाच्या सागरी मार्गावरून प्रवेश नाकारला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे विधान केले आहे.
