एपी, दुबई
‘इराणबरोबर चांगली चर्चा सुरू आहे’, ‘इराणमध्ये अमेरिकेने यापूर्वीच सत्ताबदल केला असून, नवे नेते योग्य वाटतात’, अशी विधाने एकीकडे करताना ‘अमेरिका इराणमधील खार्ग बेटांचा ताबा घेऊ शकते’, असे विधानही अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले. दुसरीकडे इराणने अमेरिकेच्या मागण्या अवास्तव असल्याचे सांगून, अमेरिकेबरोबर थेट संवाद अद्याप झाला नसल्याचे म्हटले आहे.
अमेरिका-इराणमधील या परस्परविरोधी टिप्पणींमुळे युद्ध संपण्याबाबतचा संभ्रम कायम असून, त्याची परिणती सोमवारी तेलाच्या किमतीमध्ये वाढ होण्यात झाली. कच्चे तेल प्रतिपिंप ११६ डॉलरवर गेले.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘इराणमधील अत्यंत महत्त्वाचे तेलकेंद्र असलेल्या खार्ग बेटावर अमेरिका ताबा घेऊ शकते. आम्ही खार्ग बेट घेऊ किंवा घेणारही नाही. आमच्याकडे अनेक पर्याय आहेत. आम्ही कदाचित तिथे (खार्ग बेटावर) काही काळही घालवू.’ अमेरिकेचे आक्रमण झाल्यास इराणने पर्शियन आखातात सुरुंग पेरण्याची धमकी दिली आहे.
अन्य एके ठिकाणी ट्रम्प म्हणाले, ‘आयातुल्ला अली खामेनी आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना हवाई हल्ल्यामध्ये मारून अमेरिकेने इराणमध्ये सत्ताबदल यापूर्वीच घडविला आहे. त्यांच्या जागी आलेले नेते आता योग्य वाटतात.’ खामेनी यांच्यानंतर त्यांच्या जागी त्यांचा मुलगा मोजताबा खामेनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सोमवारपासून पुढे काही दिवस २० तेलवाहू नौका सोडण्याची तयारी इराणने दाखविल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
इराणबरोबरील वाटाघाटीमध्ये आम्ही खूपच प्रगती करीत आहोत. पण, इराणच्या बाबतीत काही सांगू शकत नाही. कारण आम्ही त्यांच्याशी चर्चा करतो आणि नंतर त्यांच्यावर हल्ले करणे भाग पडते. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
‘अमेरिकेच्या मागण्या अवास्तव’
अमेरिकेच्या १५ मुद्द्यांच्या प्रस्तावात अवास्तव मागण्या केल्याचे इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ईस्माईल बघाई यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, ‘अमेरिकेबरोबर अद्याप थेट चर्चा झाली नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. आमच्यापर्यंत जो संवाद पोहोचविण्यात आला, ते १५ मुद्दे हे अवास्तव, अतिरेकी आणि विचारशून्य आहेत.’
कच्चे तेल ११६ डॉलरवर
पश्चिम आखातातील युद्धाच्या झळांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती वाढल्या असून, ब्रेंट क्रूड फ्यूचर्समध्ये सोमवारी २.८ टक्के वाढ होऊन प्रतिबॅरल तेल ११६ डॉलरवर पोहोचले.
युक्रेनचे पश्चिम आशियातील देशांशी करार
युक्रेनचे अध्यक्ष व्लोदोदिमिर झेलेन्स्की यांनी सौदी अरेबिया, संयुक्त अरब आमिराती, कतार, जॉर्डन यांच्याबरोबर संरक्षण आणि आर्थिक सहकार्यवृद्धीचे करार केले. लष्करी तंत्रज्ञान, ऊर्जा, व्यापार क्षेत्रात किमान दशकभरासाठी सामरिक सहकार्य करण्यात येईल, असे झेलेन्स्की म्हणाले. काळ्या समुद्रातील वाहतूक नौदलासाठी तयार केलेले ड्रोन वापरून सुरळीत केल्याचा अनुभव सांगून होर्मुझच्या सामुद्रधुनीसाठीही त्याचा उपयोग होईल, असे ते म्हणाले.
आखातातील युद्ध तुमच्याशिवाय कुणीही थांबवू शकत नाही, असे मी अध्यक्ष ट्रम्प यांना सांगितले आहे. मी मानवतेच्या, शांततेच्या दृष्टिकोनातून हे बोलत आहे. या प्रदेशातील जनतेच्या वतीने मी युद्ध थांबविण्याचे थेट साकडे तुम्हाला घालत आहे. हे युद्ध पुढे सुरू ठेवण्याचे गंभीर परिणाम आहेत. हे युद्ध संपविण्यासाठी मदत करा. तुम्ही त्यासाठी सक्षम आहात. – आब्देल फताह अल सिसी, अध्यक्ष, इजिप्त
अन्य घडामोडी
– अमेरिका आणि इस्रायलने सोमवारी इराणवर हल्ले सुरूच ठेवले.
– इराणने कुवेतमधील महत्त्वाच्या जल आणि विद्युत प्रकल्पावर मोठा हल्ला केला.
– इराणच्या युद्धात सहभागी अमेरिकेच्या विमानांना स्पेनकडून त्यांच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेशास बंदी. संरक्षणमंत्री मार्गारिटा रूबल्स यांची माहिती.
– बगदादच्या पश्चिमेकडील हवाई तळावरील रॉकेट हल्ल्यात लढाऊ विमान नष्ट. इराकच्या संरक्षण मंत्रालयाची माहिती.
– इराणने इस्रायलवर सोमवारी क्षेपणास्त्रांचा मोठ्या प्रमाणावर मारा केला. इस्रायलनेही तेहरानवर बॉम्बवर्षाव केला.
