Donald Trump warns to Iran : अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी युद्धविराम झाला आहे. मात्र, आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धविरामाची मुदत संपण्याआधीच इराणला पुन्हा एकदा इशारा दिला आहे. येत्या बधवारपर्यंत करार केला नाहीत तर युद्धबंदी संपुष्टात येऊ शकते, अशी धमकीच ट्रम्प यांनी इराणला दिली आहे. त्यामुळे आखाती देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा लष्करी कारवाया सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पुन्हा बॉम्बफेक करू

फिनिक्स, ॲरिझोना येथून वॉशिंग्टनला एअर फोर्स वनने परतताना पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी युद्धबंदी वाढवण्याबाबत अनिश्चितता दर्शवली. ते म्हणाले, “कदाचित मी ती वाढवणार नाही, परंतु (इराणी बंदरांवरील) नाकेबंदी कायम राहील. त्यामुळे ही नाकेबंदी सुरूच असेल आणि दुर्दैवाने आम्हाला पुन्हा बॉम्बफेक सुरू करावी लागेल.”

अमेरिका आणि इराणमधील रखडलेल्या राजनैतिक प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या अप्रत्यक्ष चर्चेच्या फेरीत कोणताही तोडगा निघू शकला नाही. बॅकचॅनल चर्चेमुळे तणाव कमी होण्याची आशा निर्माण झाली असली, तरी निर्बंधांमधून सवलत, अण्वस्त्र वचनबद्धता आणि सागरी सुरक्षा यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये मतभेद कायम आहेत.

जगातील सुमारे २० टक्के तेल आणि लिक्विफाइड नॅचरल गॅस (LNG) ची वाहतूक होणाऱ्या ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ या महत्त्वाच्या ऊर्जा मार्गावरील तणावामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. वॉशिंग्टनने हा जलमार्ग सुरक्षित आणि वाहतुकीसाठी खुला असल्याचे म्हटले असले, तरी अमेरिकेचा दबाव कायम राहिल्यास हा मार्ग रोखला जाऊ शकतो, असा इशारा तेहरानने दिला आहे.

अमेरिकेने एप्रिलच्या मध्यापासून इराणी बंदरांवर नौदलाची नाकेबंदी केली असून, इराणशी संबंधित सागरी हालचालींवर मर्यादा आणणे हा यामागचा उद्देश आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, या नाकेबंदी अंतर्गत इराणी बंदरांत येणाऱ्या किंवा तिथून जाणाऱ्या जहाजांना परतवून लावले जात आहे. इराणने मात्र हे पाऊल बेकायदेशीर आणि चिथावणीखोर असल्याचे सांगत निषेध केला आहे.
इराणी नेत्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी आणि व्यापक वाटाघाटींबाबत अमेरिकेचे दावे फेटाळून लावले आहेत. तेहरानमधील अधिकाऱ्यांनी सूचित केले आहे की, नाकेबंदी सुरू राहिल्यास त्याचा थेट परिणाम होर्मुझमधील जहाजांच्या वाहतुकीवर होऊ शकतो, यामुळे जागतिक बाजारपेठेत चिंतेचे वातावरण आहे.