Donald Trump Iran peace talks: “इराणमधून युरेनियम आम्ही आत्ताही मिळवू शकतो. आम्ही ठरवले तर ते आम्हाला रोखू शकतील असे मला वाटत नाही, पण त्याची काही गरज नाही. ते गाडले गेलेत,” असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पत्रकारांशी बोलताना म्हणाले. इराणला समृद्ध युरेनियमचा साठा ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा सातत्याने पुनरुच्चार ट्रम्प यांनी केला आहे. शांतात करारात युरेनियमचा साठा नष्ट करणे किंवा देशाबाहेर काढणे ही चालू असलेल्या अमेरिका-इराण शांतता वाटाघाटीतील प्रमुख अट देखील आहे.
‘ट्रम्प मोजतबा खामेनींना भेटणार का?
डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी इराण युद्ध आणि शांतता करारावर भाष्य केले. हा करार झाल्यास इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांची भेट घेणे हा आपला बहुमान असेल, असे ट्रम्प यावेळी म्हणाले. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या संयुक्त हवाई हल्ल्यात सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पुत्र मोजताबा खामेनी यांची उत्तराधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. ट्रम्प यांना मोजताबा यांच्याबाबत प्रश्न विचारला असता, “मला भेटण्याची इच्छा नाही, पण जर मी भेटलो, तर तो माझ्यासाठी गौरवाची बाब असेल,” असे ट्रम्प म्हणाले.
मी त्यांचा आवडता व्यक्ती नक्कीच नसेन – ट्रम्प
अमेरिका आणि इराणमधील संभाव्य करारावर बोलताना, “आमच्यात करार होतो का, हे मला पाहायचंय. पण जर करार झाला, तर मी त्यांची भेट घेणे शक्य आहे,” असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकन आणि इस्रायली दलांनी खामेनी यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांना ठार केले असले तरी खामेनी हे व्यावसायिक भूमिका बजावतील, अशी अपेक्षा ट्रम्प यांनी व्यक्त केली. ”आम्ही त्यांच्या वडिलांना, पत्नीला आणि मुलाला मारले आहे, त्यामुळे मी त्यांचा आवडता व्यक्ती नक्कीच नसेन…,(पण) काही वर्तुळात त्यांची प्रतिमा प्रत्यक्षात खूप चांगली आहे,” असे ट्रम्प म्हणाले.
कोठे होणार भेट?
इराणी सर्वोच्च नेते मोजताबा यांच्याशी संभाव्य बैठक कुठे होऊ शकते? याबाबत प्रश्न विचारला असाता ट्रम्प म्हणाले की, “याबद्दल मी अजून फारसे काही ऐकलेले नाही. मी हा प्रस्ताव मांडलेला नाही, परंतु काही लोकांनी तशी सूचना केली आहे.” सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता चर्चा पुढे सरकत असल्याचे सांगितले जात आहे. पण, अलिकडेच दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केल्याने या चर्चेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे.
