वृत्तसंस्था, वॉशिंग्टन, इस्लामाबाद

“पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी आमच्याशी चर्चा करायची असेल तर इराणने आमच्याशी संपर्क साधावा,” असे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी पुन्हा एकदा सांगितले. शुक्रवारी पाकिस्तानला पोहोचलेले इराणचे परराष्ट्रमंत्री सईद अब्बास अराघची यांनी शनिवारी पाकिस्तानी नेत्यांशी चर्चा केली. मात्र, अमेरिकी प्रतिनिधी पोहोचण्याच्या आधीच ते ओमानच्या दौऱ्यावर निघून गेले. त्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकी शिष्टमंडळाचा पाकिस्तान दौरा रद्द करत असल्याचे जाहीर केले होते. त्याचा त्यांनी रविवारी पुनरुच्चार केला.

यादरम्यान, ओमानचा एक दिवसाचा दौरा आटोपून अराघची रविवारी पुन्हा पाकिस्तानला परतले. ते रशियाला जाण्यापूर्वी थोडावेळ पाकिस्तानला थांबल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने पाकिस्तानात तैनात केलेली सुरक्षा उपकरणे हटवली आहेत. त्यामुळे अमेरिका-इराण चर्चेची पुढील फेरी पाकिस्तानात होण्याची शक्यता मावळली असल्याचे मानले जात आहे. असे असले तरी, इराण आमच्याशी थेट संपर्क साधू शकतो असे सांगून ट्रम्प यांनी चर्चेस तयार असल्याचा संदेशही दिला आहे.

इराणचा अणुकार्यक्रम आणि युद्ध सुरू झाल्यापासून होर्मुझची सामुद्रधुनी हे वाटाघाटींसाठी महत्त्वाचे मुद्दे असल्याचे मानले जात आहे.

जर त्यांना बोलायचे असेल तर ते आमच्याकडे येऊ शकतात किंवा आम्हाला फोन करू शकतात. आमची दूरसंचार यंत्रणा अगदी छान, सुरक्षित आहे. करारामध्ये काय असायला हवे हे त्यांना माहीत आहे. ते अण्वस्त्रे बाळगू शकत नाहीत, इतके ते साधे आहे. अन्यथा भेटण्यात काहीच अर्थ नाही. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका

अराघची पुन्हा पाकिस्तानात

अराघची रशियाला जाण्यापूर्वी पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा करत असल्याची माहिती पाकिस्तान सरकारच्या सूत्रांनी दिली. तर इराणच्या तस्निम या निमसरकारी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या चर्चेमध्ये होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नवे कायदे लागू करणे, युद्धाची नुकसानभरपाई मिळणे, पुन्हा लष्करी हल्ले न होणे आणि अमेरिकी नौदलाने केलेली नाकेबंदी हटवणे या इराणच्या मागण्यांचा समावेश असेल. अमेरिकेच्या मागण्या अतिरेकी स्वरूपाच्या असल्याचे शनिवारी इराणने म्हटले होते. मात्र, ट्रम्प यांनी पुन्हा थेट चर्चा करण्याचे आवाहन केल्यानंतर इराणकडून प्रतिक्रिया आलेली नाही.