Trump US Declare Total Victory Iran breaking news updates: इस्रायलने लेबनॉनमधील हल्ले सुरूच ठेवल्याने इराणने रविवारी रात्री उशिरा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलनेही इराणवर हल्ले केले. इराणवरील लष्करी कारवाईला १०० दिवस पूर्ण होत असताना दोन देशांकडून परस्पर हल्ले सुरू झाल्यामुळे त्याचे पडसाद जगभर उमटले. अमेरिकेने यात मध्यस्थी करून दोघांनाही हल्ले थांबवण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांत अमेरिका इराणवर पूर्ण विजयाची घोषणा करेल, असा अंदाज राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधला आहे. अमेरिकेतील सीबीसी न्यूज या वृत्तस्थळाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पुढील दोन आठवड्यांत अमेरिका इराणवर पूर्ण विजयाची घोषणा करण्यास सक्षम असेल, असा अंदाज राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी वर्तवला आहे. इराणच्या बाजूने वाटाघाटी करणारे आपल्याला सर्व काही देण्यास तयार आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. साउथ कॅरोलिनाचे रिपब्लिकन पक्षाचे सिनेटर लिंडसे ग्रॅहम आणि गव्हर्नर पदाच्या उमेदवार पामेला इव्हेट यांच्यासाठी सोमवारी संध्याकाळी आयोजित केलेल्या टेलि-रॅलीदरम्यान राष्ट्राध्यक्ष म्हणाले, “पुढील दोन आठवड्यांत जेव्हा आपण पूर्ण विजयाची घोषणा करू, तेव्हा तुम्ही खरोखरच यात विजय मिळवाल. हा एक पूर्ण विजय असेल, हे खूप लवकर घडेल आणि खनिज तेलाच्या (ऑइल) किमती कमालीच्या घसरतील.”
२८ फेब्रुवारीपासून हे युद्ध सुरू झाले. ८ एप्रिल रोजी या युद्धविराम जाहीर करण्यात आला. मात्र, युद्धबंदीच्या चर्चांना अंतिम स्वरुप प्राप्त होत नव्हतं. कोणताही करार पूर्णत्वास जात नव्हता. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही चिंता वाढून थेट सामान्य नागरिकांच्या खिशाला चटका बसला. दरम्यान, येत्या दोन आठवड्यांत हा संघर्ष संपू शकतो, असा अंदाज वर्तवल्याने जगभरातील देशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दोन्ही देशांमधील वाटाघाटी सध्या नेमक्या कोणत्या टप्प्यावर आहेत, हे अद्याप अस्पष्ट आहे.
इराण, इस्रायलमधील भारतीयांना इशारा
इस्रायल आणि इराणमधील संघर्षानंतर भारताने दोन्ही देशांतील आपल्या नागरिकांसाठी सूचना जारी केली आहे. इस्रायलमधील भारतीयांनी अतिशय सावधगिरी बाळगावी, जागरूक राहावे आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेले नियम पाळावेत, असे आवाहन केले. तर इराणमधील भारतीयांनी वाहतुकीची जी साधने उपलब्ध असतील, तिचा वापर करून, देश सोडण्याचे आवाहन केले. इस्रायलमधील वकिलात आणि इराणमधील भारतीय दूतावासाने संबंधित देशांमधील भारतीयांना हे आवाहन केले. भारताने यापूर्वी ७ एप्रिल रोजी इराणमधील भारतीयांसाठी सूचना जारी केली होती. युद्ध सुरू होताना इराणमध्ये एकूण ९ हजार भारतीय होते. त्यातील १८०० भारतीय आतापर्यंत परत आले आहेत.
