Donald Trump Iran US Deal: अमेरिका आणि इराण यांच्या पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे. मध्य पूर्वेतील देशांनी मध्यस्थी केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी चर्चेला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे, असे ट्रम्प म्हणालेत. ट्रम्प यांनी ट्रूथ सोशल या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमधून इराणवर दुतोंडीपणाचा आरोप केला आहे. तसेच, इराणने चर्चेसाठी भिक मागितली होती असा दावाही त्यांनी आहे. “इराणने मान्य करो किंवा न करो, परंतु त्यांनीच निर्माण केलेल्या समस्येवर आम्ही तोडगा काढण्यासाठी चर्चा करत आहोत,” असे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.
होर्मुझ सामुद्रधुनीबाबत ट्रम्प काय म्हणाले?
ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनीवरील नियंत्रणाबाबत इराणच्या दाव्यांचेही खंडन केले. “होर्मुझ सामुद्रधुनी त्यांना व्यवस्थितपणे चालवता येईल, असं त्यांना वाटतं. पण, होर्मुझ अमेरिकन नौदलाच्या नाकेबंदीखाली आहे”, असेही त्यांनी नमूद केले. सामुद्रधुनीतून ये-जा करण्याच्या मार्गाचे नियंत्रण पूर्णपणे अमेरिकेच्या हातात असेल, असेही ट्रम्प म्हणाले.
इराणसमोर ठेवले दोन पर्याय
“करार किंवा शरणागती पत्करली जात नाही, तोपर्यंत आमची इच्छा असल्याशिवाय इराणला काहीही पोहोचू दिले जाणार नाही आणि काहीही दिले जाणार नाही,” असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे. ट्रम्प यांनी इराणवर भीषण हल्ला करण्याची धमकी दिली होती. हा हल्ला दुसऱ्या महायुद्धानंतरचा सर्वात भीषण हल्ला असता, असे ट्रम्प यांनी म्हटले होते. दरम्यान, या कारवाईपासून माघार घेत असल्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
चर्चेबाबत अमेरिका आणि इराणचा दावा
कतार, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती या आखाती मित्र राष्ट्रांच्या विनंतीवरून, ट्रम्प यांनी नियोजित भीषण हल्ला स्थगित केल्याचे रविवारी सांगितले होते. आखातातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर आणि इराणच्या निनावी अधिकाऱ्यांच्या संपर्कानंतर त्यांनी मुत्सद्देगिरीला आणखी वाव देण्याचे ठरवले, असे ते म्हणाले. “आम्ही त्यांच्याशी वाटाघाटीसाठी चर्चा करत आहोत. सोमवारी दुपारीपासून चर्चा सुरू होईल,” असे ट्र्म्प म्हणाले, मात्र या चर्चेत कोण सहभागी होणार याबाबत त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. दरम्यान, इराणने अशा कोणत्याही चर्चेचा दावा फेटाळून लावला आहे. इराणची अमेरिकेबरोबर चर्चा सुरु नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माइल बाघेई यांनी स्पष्ट केले आहे.
