Donald Trump Iran US Iran Tension Latest News Updates : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचं २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका-इस्रायलने इराणविरोधात केलेल्या हल्ल्यात निधन झालं. त्यानंतर, चार महिन्यांनी त्यांच्या पार्थिवावर अत्यंसंस्कार होणार आहे. त्याकरता देशभरासह अनेक परदेशी नागरिक त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी इराणमध्ये दाखल होत आहेत. असं असतानाच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला डिवचलं. खामेनीप्रमाणेच इराणमधील इतर सर्व नेते एका झटक्यात संपवू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता इराणनेही प्रतिक्रिया दिली आहे.
खामेनी यांच्या निधनावर हजारो इराणी नागरिकांना शोक करताना पाहून आपल्याला आश्चर्य वाटल्याचं, एका मुलाखतीत ट्रम्प यांनी ॲक्सिओस या वृत्तवाहिनीला सांगितलं. “मला वाटलं होतं की लोक खामेनींचा तिरस्कार करतात. कदाचित हे अश्रू बनावट असावेत”, असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी पुढे असा दावा केला की, अमेरिकेने ठरवलं असतं तर ‘एकाच झटक्यात इराणच्या उर्वरित नेतृत्वाला संपवून टाकले असते. मात्र, तेहरानसोबतची राजनैतिक चर्चा सुरू राहावी म्हणून वॉशिंग्टनने स्वतःला आवरलं. “ते सगळे एकाच ठिकाणी आहेत. एकाच झटक्यात आपण त्या सर्वांचा खात्मा करू शकतो. पण आम्ही असं करणार नाही कारण त्यानंतर आमच्याकडे वाटाघाटी करण्यासाठी कुणीच उरणार नाही”, असं ट्रम्प यांनी म्हटल्याचं ॲक्सिओसने वृत्तात म्हटलं आहे.
इराणचं प्रत्युत्तर काय?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यावर आता इराणनेही प्रतिक्रिया दिली आहे. “लोकांना मारलं जाऊ शकते, पण विचारांना नाही. तुम्ही अयातुल्ला खामेनी यांची हत्या केली, पण वास्तवात तुम्ही एक अत्तराची बाटली फोडली आहे, ज्याचा सुगंध आता सगळीकडे पसरला आहे”, असं अर्मेनियाच्या इराणच्या दूतावासानं एक्स पोस्ट केलं आहे. तसंच, “खामेनी यांच्या निधनामुळे आलेला दुःखाचा महापूर कधीही समजणार नाही, कारण अमेरिकेला “ना संस्कृती आहे, ना इतिहास, आणि ना सन्मान”, असा उपरोधिक टोलाही लगावला.
खामेनी यांच्या अंत्यसंस्काराची मिरवणूक (प्रसेशन) शुक्रवारी, ३ जुलै रोजी तेहरानमध्ये सुरू झाली आणि ९ जुलै रोजी त्यांच्या जन्मगाव असलेल्या मशहद येथे त्यांच्या दफनविधीने ती संपणार आहे. या तारखांच्या दरम्यान कुम आणि इराकमध्येही अतिरिक्त धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. बुधवारी, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांच्या विधानाला प्रत्युत्तर देताना, इराणच्या लोकांवर किंवा नेतृत्वावर कोणत्याही धोक्याला तत्काळ आणि जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असाच इशारा दिला. काट्झ यांनी इराणचे सध्याचे सर्वोच्च नेते, अली खामेनी यांचे सुपुत्र ‘मोजताबा खमेनी’ यांना ‘मरण्यासाठी लक्ष्य केलेले असल्याचे म्हटले होते.
