Donald Trump US Pilot Rescue Mission: “तो सापडला!” अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी रविवारी सकाळी मोठ्या आनंदात केली. त्यांच्या लष्कराने अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहिमांपैकी एक यशस्वी करून दाखवली. “मला तुम्हाला कळवताना अत्यंत आनंद होत आहे की आमचा बेपत्ता वेपन अधिकारी (सैनिक) आता सुरक्षित आणि सुखरूप आहे,” असे ट्रम्प यांनी जाहीर केले. अमेरिकी लष्कराच्या विशेष तुकडीच्या सैनिकांनी तब्बल ४८ तास ही मोहीम राबवून एअरमनला सुखरुप मायदेशात घेऊन गेले. अमेरिकेच्या इतिहासात ही मोहीम नेहमीच लक्षात ठेवली जाईल.
एफ-१५ई स्ट्राईक ईगलवर हल्ला
एप्रिल ०३ रोजी इराणने अमेरिकेचे एफ-१५ई स्ट्राईक ईगल खाली पाडले. यातील पायलटला तात्काळ वाचविण्यात आले पण, वेपन अधिकारी अद्याप बेपत्ता होता. यानंतर इतिहासातील एका धाडसी मोहिमेला सुरुवात झाली. अमेरिकेला सैनिकाला वाचविण्यात यश येणार का? इराण सैनिकाला पकडणार? अशा दोन्ही शक्यता निर्माण झाल्या. इराणी नागरिक आणि लष्कराच्या तावडीत सापडू नये यासाठी एअरमनने केलेले प्रयत्न आणि त्याने तीन दिवस जिंवत राहण्यासाठी केलेली धडपड एखाद्या हॉलीवूड सिनेमाच्या पटकथेसारखी थरारक आहे.
पायलटला वाचवले, एअरमन बेपत्ता
अमेरिकी एअरमन या दोन क्रू असलेल्या एफ-१५ई स्ट्राईक ईगल विमानात होता. ०३ एप्रिल रोजी इराणने हे विमान हल्ला करुन खाली पाडले. इराणने अमेरिकी लढाऊ विमान खाली पाडण्यासाठी नव्याने तयार केलेल्या एअर डिफेन्स प्राणालीचा वापर केल्याचा दावा केला. उभय देशांत संघर्ष सुरु झाल्यापासून इराणने अमेरिकी विमान खाली पाडल्याची ही मोठी कारवाई मानली जाते. विमानावर हल्ला झाल्यानंतर यातील दोन्ही क्रू बाहेर झेपावले. अमेरिकी सैनिकांनी या विमानाच्या पायलटला सुखरुप वाचवले पण, यातील एअरमन अद्याप बेपत्ता होता.
डोंगररांगेत आश्रय
लढाऊ विमानातून बाहेर पडलेल्या एअरमनची माहिती अद्याप मिळाली नव्हती. पण, एअरमन गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली. इराणच्या भूमीत उतरल्यानंतर अमेरिकी सैनिकांना अश परिस्थितीत कशापद्धतीने स्वत:ला वाचवायला हवं या प्रशिक्षणाचा संपूर्ण वापर केला. इराणी लष्कर आणि स्थानिकांच्या तावडीत सापडू नये म्हणून सैनिक लपून राहिला. त्याने ७,००० फूट उंच डोंगररांग चढून एका भेगेत आश्रय घेतला. इराणी सैन्य त्याचा शोध घेत असताना, त्याने झाग्रोस पर्वतरांगेत जवळपास ४८ तास लपून काढले.
मदतीच्या आशेवर जिवंत
अमेरिकी सैनिक बचावासाठी येईपर्यंत एअरमनला वाट पाहावी लागणार होती. सर्वत्र शोध घेणारे स्थानिक आणि लष्करी सैनिक यांच्यापासून बचाव देखील या सैनिकाला करायचा होता. यावेळी सैनिकाकडे केवळ एक पिस्तूल, संभाषण करण्यासाठी एक उपकरण आणि ट्रॅकिंग बिकन एवढ्याच वस्तू त्याच्याकडे होत्या. याशिवाय लष्करी प्रशिक्षणाच्या जिवावर त्याने धीर न सोडता बचाव पथकाची वाट पाहण्याचा निर्णय घेतला. याकाळात त्याने पर्वतरांगात असलेल्या कपाऱ्यांचा आडोसा म्हणून आधार घेतला. आपला देश मदतीला येईल या अपेक्षेवर तो वेदना सहन करत जिंवत होता.
तीन शब्दांचा तो संदेश
त्याच्याकडे असणारे संभाषणाचे उपकरण त्याला वापरता येत नव्हते, इराणी लष्काराला त्याचा ठाव लागू शकतो अशी भीती त्याच्या मनात होती. पण, त्यांने तीन शब्दांचा संदेश अमेरिकेला पाठवला. पण, अमेरिकेला तो संदेश म्हणजे इराणी यंत्राणांनी टाकलेला डाव भासला. सैनिकांना जाळ्यात ओढण्यासाठी इराणी यंत्राणा कट रचत असल्याची अमेरिकी यंत्रणांना शंका आली. या संदेशाचा अर्थ काढण्यासाठी आणि सत्यता पडताळण्यासाठी अमेरिकी यंत्रणांना फार वेळ लागला. दरम्यान, सीआयएने एअरमनचा संदेश खरा असल्याचा निष्कर्ष काढून त्याच्या ठिकाणाचा शोध घेतला.
१०० जणांची टीम
माहितीची पडताळणी केल्यानंतर अमेरिकेच्या विशेष तुकडीने एअरमनची बचाव मोहीम हाती घेतली. एअरमनला सुखरुप माघारी परत घेऊन येण्यासाठी विशेष लष्करी जवान, गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी यांची जवळपास १०० जणांची टीम तयार करण्यात आली. आणि अखेर एअरमनला माघारी परत आणण्यासाठी डझनभर विमान, ड्रोन यांच्या पथकाने उडाण घेतले. या पथकाने जखमी एअरमनच्या ठिकाणाच्या शोध घेऊन त्याच्याजवळ लँडिंग केले. सुरुवातीला त्याला प्रथमोपचार देऊन सुखरुप विमानात घेण्यात आले.
अमेरिकेने आपलीच विमाने केली नष्ट
जखमी वैमानिकाला इराणमधून बाहेर पडत असताना दोन एमसी-१३०जे विमाने कच्च्या धावपट्टीवर चिखलात अडकली आणि ती शत्रूच्या हाती पडू नयेत म्हणून नष्ट करावी लागली. अमेरिकेने सैनिकांना घेण्यासाठी आणि शत्रूच्या हाती लागू नये म्हणून अडकलेली वाहने नष्ट करण्यासाठी आणखी तीन विमाने पाठवली. जखमी वैमानिकाला वैद्यकीय उपचारांसाठी एका बचाव विमानातून कुवेतला नेण्यात आले आहे. या बचाव मोहिमेत इस्रायलने देखील अमेरिकेला मोठी मदत केली. या मोहिमेसाठी लागणारी गुप्त माहिती आणि इतर सूचना इस्रायलने दिल्याचे जेरुसलेम पोस्टच्या वृत्तात म्हटले आहे.
नेत्यानाहू यांच्याकडून कौतुक
इराणी सैनिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी इस्रायने विविध ठिकाणी हल्ले केले त्यामुळे अमेरिकेला बचाव मोहिम राबविण्यात सहकार्य झाले. अमेरिकेने राबविलेली बचाव मोहीम यशस्वी केल्याबद्दल बिन्यामीन नेतान्याहू यांनी रविवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांना अमेरिकेचे कौतुक करताना इस्रायलने देखील सहकार्य केल्याचे नमूद केले.
डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील या बचावकार्याला ऐतिहासिक घटना म्हणून नमूद केले. “लष्करी इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे की, दोन अमेरिकी वैमानिकांना शत्रूच्या प्रदेशातून वेगवेगळ्या वेळी वाचवण्यात आले आहे, असे ट्रम्प यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
