Donald Trump : २७ आणि २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायल यांनी इराण विरोधात संयुक्त कारवाई करत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना ठार केलं. अयातुल्ला खामेनी यांना त्यांच्या घरावर क्षेपणास्त्रांचा अचूक मारा करत ठार करण्यात आलं. इराणशी जे युद्ध सुरु झालं होतं त्या युद्धाला ३५ दिवसांनी युद्धविराम दिला गेला. तसंच नुकतीच ही मुदत आणखी वाढवण्यात आली. डोनाल्ड ट्रम्प यांना अपेक्षा होती की हे युद्ध एक ते दोन आठवड्यात संपेल. पण तसं घडलं नाही. मुळात डोनाल्ड ट्रम्प यांनी या युद्धात भाग का घेतला? त्यामागचं कारण काय होतं? याबाबत भौगोलिक विषयांमधले तज्ज्ञ इयान बर्मर यांनी The Diary Of A CEO Clips या पॉडकास्टमध्ये भाष्य केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात काय घडलं होतं? यावरही त्यांनी भाष्य केलं.

डोनाल्ड ट्रम्प यांची दुसऱ्यांदा माघार

डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसह सुरु असलेल्या युद्धविरामाची मुदत आणखी वाढवली आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय काय घ्यायचा? याबाबत काहीसा वेळ आणखी मिळवला आहे. तसंच आता जी मुदतवाढ दिली आहे तिला कालमर्यादा दिलेली नाही. आम्ही इराणला युद्ध संपवण्यासाठी संयुक्त प्रस्ताव देत आहोत इतकंच सांगितलं आहे. यावरुनच डोनाल्ड ट्रम्प यांचा कल हा संघर्ष संपवण्याच्या दृष्टीने आहे असं दिसून येतं आहे.गेल्या दोन आठवड्यांतील ही दुसरी वेळ आहे, जेव्हा ट्रम्प युद्ध वाढवण्याच्या इशाऱ्यापासून मागे हटले आहेत. आता इयान बर्मर यांनी काय म्हटलं आहे? जाणून घेऊ.

The REAL Reason Trump Started The Iran War
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांबाबत नेमकं काय म्हणाले इयान बर्मर? (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)

काय म्हणाले इयान बर्मर?

डोनाल्ड ट्रम्प यांना लोकांनी निवडूनच अशासाठी दिलं होतं कारण त्यांनी तालिबानशी तडजोड केली. डोनाल्ड ट्रम्प यांच्या तडजोडीनंतर अमेरिकेने अफगाणिस्तानधून सैन्य मागे घेतलं. व्हिएतनाम, इराक, अफगाणिस्तान या ठिकाणी जे चाललं होतं त्याचा अमेरिकेला काही फायदा होत नव्हता. त्यामुळे त्यांनी हा समझोता केला. आता यामागची कारण काय? असा प्रश्न येतोच. ती आपण समजून घेऊ, त्याआधी मी तुम्हाला व्हेनेझुएलाकडे घेऊन जाईन.

व्हेनेझुएलात काय घडलं?

काराकासमध्ये केलेल्या कारवाईत अमेरिकेच्या सैन्यानं व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला अटक केली. डोनाल्ड ट्रम्प यांची ही मोठी खेळी होती. परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ आणि संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांचा समावेश असलेली एक टीम व्हेनेझुएलामधील लोकांबरोबर काम करत होती, अतिशय कठीण अशा परिस्थितीत सापडलेल्या या राष्ट्राची जबाबदारी ते घेतील असं ट्रम्प यांनी जाहीर केलं होतं. तसंच “जोपर्यंत आम्ही एक सुरक्षित, योग्य आणि न्याय्य सत्तांतर करत नाही, तोपर्यंत आम्ही या देशाचा कारभार चालवणार आहोत,” असं ट्रम्प यांनी सांगितलं होतं. व्हेनेझुएलाचा प्रश्नही भिजत पडला होता. वर्षाच्या सुरुवातीला डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाला गेले होते. तिथल्या लोकांना त्यांनी समजावलं की अमेरिकेत आता माझी सत्ता आली आहे. मला पाठिंबा दिलात तर मी तुमचं भलं करु शकतो. हे त्यांना समजावून सांगितलं.

Donald Trump
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Photo – Reuters)

इराणशी वैर पहिल्या कार्यकाळापासूनच

या कारवाईनंतर डोनाल्ड ट्रम्प यांना वाटलं की आपण हेच तंत्र इराणमध्ये राबवू शकतो. पण तसं घडलं नाही. शिवाय इराणवर ट्रम्प यांनी हल्ला करण्याचं आणखी एक कारण होतं. ट्रम्प पहिल्यांदा राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा त्यांच्या त्या कार्यकाळात इराणी सैनिकांनी अमेरिकेतल्या लोकांवर हल्ले करत होते आणि रिफायनरींच्या विरोधातही हल्ले करत होते. यामध्ये ड्रोन हल्ल्यांचा समावेश होता. सौदी आणि अमिराती तेव्हा ट्रम्प यांच्याकडे विचारणा करत होते की तुम्ही इराणवर कारवाई कधी करणार? पण ट्रम्प शांत होते. पण त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प हे चांगलेच नाराज झाले होते. त्यांचा तो कार्यकाळ संपताना त्यांनी इराणच्या कासिम सुलेमानीच्या हत्येचे आदेश दिले. इराण या मुद्द्यावरुन चांगलाच चिडला होता.

गेल्या वर्षी जून महिन्यात मिळालेली माहिती तर फेब्रुवारीत केलेला हल्ला काय घडलं थोडक्यात

मागच्या वर्षीच्या जून महिन्यात इराणने त्यांच्या बॅलेस्टिक मिसाईल्सचा विकास सुरु केला. तसंच अणुशक्तीचा उपयोग करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना गुप्त माहिती मिळत होती. त्यावेळीच इस्रायल आणि इराणचा संघर्ष वाढला. पण अमेरिकेवर त्यावेळी इराणने हल्ला केला नाही. मग डोनाल्ड ट्रम्प यांना हे जाणवलं की मी इराणमध्ये सैन्य पाठवतो आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्याला ठार करतो, कारण त्यांचं वय पाहता त्यांचा मृत्यू होणारच आहे. त्यानंतर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत अयातुल्ला खामेनी यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना ठार करण्यात आलं. माझ्याकडे विशाल सैन्यबळ आहे, तर इराणच्या नेतृत्वाला मी आव्हान देईनच शिवाय नंतर त्यांच्याकडे मला शरण येण्यावाचून पर्याय नसेल. पण डोनाल्ड ट्रम्प यांचा हा अंदाज चुकला कारण इराणने झुंज दिली त्या देशाने ट्र्प यांच्या पुढे गुडघे टेकले नाहीत. अमेरिकेने खामेनी यांना ठार केलं. तसंच इतर काही सर्वोच्च नेत्यांनाही ठार केलं. त्यानंतर ते म्हणाले की ज्यांच्याशी चर्चा होईल असं इराणमध्ये कुणीही नाही. त्यांना असं वाटलं होतं की नवा नेता आपल्याला विश्वासात घेईल किंवा आपलंच ऐकेल. पण डोनाल्ड यांना जे वाटत होतं ते घडलं नाही. इराणने होर्मुझ समुद्रधुनी बंद केली. तसंच त्यांनी इतर देशांवर हल्ले केले आणि प्रत्युत्तर दिलं. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर युद्धविरामाची घोषणा केली असं इयान बर्मर यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांनी वाटाघाटी करायचा खूप प्रयत्न झाला. डोनाल्ड ट्रम्प यांना जे हवं होतं ते या हल्ल्यातून मिळालं नाही असं इयान बर्मर यांनी सांगितलं.