JD Vance opposition to Iran war: अमेरिका – इस्रायलविरुद्ध इराण युद्धात ४० दिवसांनी अखेर शस्त्रसंधी झाली. शस्त्रसंधीची माहिती देताना अमेरिका आणि इराणकडून पाकिस्तानच्या मध्यस्थीचा उल्लेख करण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर युद्धविरामाचा निर्णय घेण्यात आल्याचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या संदेशात नमूद केले आहे. शस्त्रसंधीच्या या निर्णयामागे इराणने १० अटी देखील ठेवल्या आहेत. तिन्ही देशात सुरु असलेला संघर्ष तात्पुरता थांबल्यानंतर पडद्यामागील काही घडामोडी आता समोर येऊ लागल्या आहेत.

नवीन पुस्तकात नवे खुलासे

पत्रकार मॅगी हॅबरमन आणि जोनाथन स्वान यांच्या ‘रेजिम चेंज: इनसाइड द इम्पेरियल प्रेसिडेंसी ऑफ डोनाल्ड ट्रम्प’ या येऊ घातलेल्या पुस्तकात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. न्यूयॉर्क टाइम्सने या पुस्तकाचा संदर्भ देत एक वृत्त प्रसिद्ध केले आहे. इराणविरुद्ध युद्ध सुरु करण्यापूर्वी व्हाईट हाऊसच्या सिच्युएशन रूममध्ये एक गुप्त बैठक पार पडली. या बैठकीत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी ट्रम्प आणि त्यांच्या टीमसमोर एक सविस्तर प्रस्ताव ठेवला होता. “इराणविरोधात युद्ध छेडण्याची हीच योग्य वेळ असून, तिथं सत्ताबदल घडवून आणण्याची संधी आहे”, असे नेतान्याहू यांनी एक तासापेक्षा अधिककाळ केलेल्या प्रझेंन्टेशनमध्ये सांगितले, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

नेतान्याहू यांच्या अमेरिकेसमोर प्रस्ताव

इराणविरुद्ध संघर्षात निश्चित विजय मिळेल असा संदेश नेतान्याहू यांनी यावेळी ट्रम टीमला दिला. एका आठवड्यात इराणचे अण्वस्त्र कार्यक्रम उदध्वस्त केला जाईल असेही नेतान्याहू म्हणाले. होर्मुझ सामुद्रधुनी खुलीच राहील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. याशिवाय इराणमध्ये अंतर्गत बंडाळी निर्माण आणि सरकारविरोधात वातावरण तयार करण्याचे काम गुप्तहेर संस्था मोसाद पार पाडेल, असे नेतान्याहू यांनी या बैठकीत सांगितले. दरम्यान, सत्ताबदलाची साशंकता व्यक्त करत अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूमुळे इराण बॅकफूटवर येईल, असा विश्वास मात्र अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला होता. किमान इराण शेजारी राष्ट्रांना धमकी तरी देणार नाही, असे अमेरिकेने म्हटले होते.

एकाच व्यक्तीने केला युद्धाला विरोध

नेतान्याहू यांच्या प्रस्तावानंतर अमेरिकेच्या गुप्तहेर खात्याचे तसेच लष्करी विभागातील अधिकाऱ्यांनी विरोध दर्शवण्याचे धाडस केले नाही. पण, याला उपपंतप्रधान जे.डी वान्स अपवाद ठरले. उपपंतप्रधान वान्स यांचा इराणविरुद्ध युद्ध करण्यास ठाम विरोध होता. याबाबत त्यांनी स्पष्ट बाजू देखील मांडली. इराणविरोधात युद्ध केल्याने तिथं सत्ताबदल होणार नाहीच शिवाय अमेरिकेसाठी युद्ध फायदेही ठरणार नाही. या युद्धामुळे अनेक दुर्घटना, मृत्यू आणि प्रादेशिक अशांतता निर्माण होण्याचा धोकाही त्यांनी व्यक्त केला होता, असे न्यूयॉर्क टाइम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

जे.डी वान्स यांनी मांडली भूमिका

नव्याने कोणतेही युद्ध करणार नाही, असे आश्वासन दिलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी मतदारांचा विश्वासघात केला असाही संदेश जनमानसात जाण्याची भीती वान्स यांनी व्यक्त केली होती. याशिवाय अमेरिकेचा दारुगोळा आणि शस्त्रसाठा देखील समाप्त होऊ शकतो. होर्मुझ सामुद्रधुनी बंद झाल्यास जगाच्या गॅस पुरवठ्यावर आणि किंमतीवर मोठा परिणाम दिसू शकतो, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. पण, ट्रम्प युद्धाच्या समर्थनात असल्याचे समजताच वान्स यांनी विषयापासून काही प्रमाणात अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला, असे वृत्तात म्हटले आहे.

“वाईट कल्पना पण…” – वान्स

युद्धापूर्वी झालेल्या बैठकीत वान्स यांनी ट्रम्प यांनी समर्थन देण्याचा निर्णय घेतला. मला वाटतं ही वाईट कल्पना आहे, पण तुमचा निर्णय झाला असेल तर करा, मी तुमच्या बरोबर आहे, असे वान्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. ट्रम्प यांच्यासमोर अनेकांनी युद्धाच्या समर्थनात भूमिका घेतली. केवळ वान्स यांनीच युद्धाल विरोध करण्याचे धाडस दाखवले, असेही या वृत्तात म्हटले आहे.