Donald Trump slams NATO allies over Iran war : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर केलेल्या संयुक्त हल्ल्यानंतर सुरू झालेला संघर्ष अजूनही सुरू आहे. या संघर्षाचा शेवट कधी होणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले आहे. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी, अमेरिकेच्या बहुतेक नाटो (NATO) मित्रदेशांनी त्यांना इराणमधील लष्करी मोहिमेत सहभागी होण्याची इच्छा नसल्याचे कळवले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रूथ सोशलवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. सर्व मित्रराष्ट्रांचे इराणला अण्वस्त्र मिळवू देऊ नये यावर एकमत असूनही त्यांनी ही भूमिका घेतल्याचे ट्रम्प म्हणाले आहेत.
यावेळी ट्रम्प यांनी नाटो हा एक ‘एकेरी मार्ग’ असल्याची टीका केली आहे, जेथे अमेरिका दरवर्षी या देशांचे रक्षण करण्यासाठी शेकडो अब्ज डॉलर्स खर्च करतो, पण गरजेच्या वेळी त्याला खूप कमी गोष्टी परत मिळतात, असे ट्रम्प म्हणाले आहेत.
ट्रम्प पुढे म्हणाले की अमेरिकेने इराणच्या लष्कराच्या विरोधात मोठे लष्करी यश मिळवले आहे, आणि त्यामुळे, “आम्हाला आता नाटो देशांच्या मदतीची गरज किंवा अपेक्षा नाही, आम्हाला ती कधीच नव्हती.” असेही ट्रम्प यांनी नमूद केले आहे. तसेच त्यांनी यावेळी अमेरिकेला जपान, ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण कोरियाची मदतीचीही गरज नसल्याचेही ट्रम्प म्हणाले आहेत.
आपल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणाले आहेत की, अमेरिकेने इराणचे सैन्य उद्ध्वस्त केले आहे. तसेच त्यांनी असा दावा केला की इराणचे नौदल, हवाई दल, एअर डिफेन्स आणि नेतृत्व पूर्णपणे नष्ट झाले आहे. “अमेरिका हा आत्तापर्यंतचा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे” आणि “अमेरिकेला कोणाच्याही मदतीची गरज नाही”, यावरही ट्रम्प यांनी यावेळी जोर दिला.
ट्रम्प यांना मोठा धक्का
यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय दहशतवादी विरोधी पथकाचे संचालक जो केंट यांनी मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. इराण विरोधात सुरू असलेल्या युद्धामुळे आपण खूप विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असल्याचे केंट म्हणाले. “इराणकडून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका उद्भवला नव्हता. हे युद्ध इस्रायलच्या दबावामुळे सुरू करण्यात आले,” असे केंट म्हणाले आहेत.
“इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धाला मी पाठिंबा देऊ शकत नाही. इराणचा आपल्या देशाला कोणताही धोका नव्हता. इस्रायलच्या आणि अमेरिकेतील शक्तीशाली लोकांच्या दबावाला बळी पडून आपण हे युद्ध सुरू केले, हे आता उघडच आहे”, अशी भावना केंट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे. दरम्यान आपल्या पत्रात केंट यांनी ट्रम्प यांच्या पूर्वीच्या परराष्ट्र धोरणाला पाठिंबा देत राहणार असे सांगितले.
