Donald Trump Iran War update regarding Pete Hegseth’s role in military action initiation : अमेरिका-इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी संयुक्तपणे इराणवर हल्ला केल्यानंतर मध्यपुर्वेत पेटलेला संघर्षाचा आता चौथा आठवडा सुरू झाला आहे. या युद्धाचा परिणाम जगभरात पाहायला मिळत असून हा संघर्ष कधी थांबणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या परिस्थितीत ट्रम्प मात्र इराणविरोधातील युद्धाचा दोष दुसऱ्या व्यक्तीवर टाकण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. टेनेसीमध्ये सोमवारी झालेल्या एका राउंडटेबल बैठकीत ट्रम्प यांनी अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनीच सर्वप्रथम लष्करी कारवाईसाठी पुढाकार घेतला होता असे म्हटले आहे.
ट्रम्प यांनी युद्धाच्या सुरूवातीला काय चर्चा झाली याबद्दल माहिती दिली आहे. “पीट, मला वाटतं की पुढाकार घेणारे तुम्ही पहिले होतात आणि तुम्ही म्हणालात की, चला हे करूयात, कारण आपण त्यांना अण्वस्त्रं मिळवू देऊ शकत नाही,” ट्रम्प यांनी आपल्या शेजारी बसलेल्या हेगसेथ यांच्याकडे पाहून हे विधान केले. दरम्यान इराणविरोधात सुरू केलेल्या या युद्धाचे समर्थन करण्यासाठी यापूर्वीही अनेक कारणे देण्यात आली आहेत, त्यामध्ये आणखी एकाची भर पडली आहे.
इराणविरोधातील युद्ध का सुरू झाले?
ट्रम्प यांच्या प्रशासनातील वेगवेगळ्या लोकांकडून युद्धाची वेगवेगळी कारणे दिली जात आहेत. काहींचा असा दावा आहे की, इस्रायल इराणवर हल्ला करणारच होते, ज्यामुळे अमेरिकेचा या युद्धात सहभाग न टाळता येणारा होता. तर इतरांचे म्हणणे आहे की, इराण अण्वस्त्र मिळवण्याच्या खूप जवळ पोहोचला होता. त्यामुळे युद्ध सुरू करण्यात आले. यासगळ्यात ट्रम्प यांनी स्वतः तो निर्णय घेतानाचा क्षणाचे आपल्या शब्दात वर्णन केले आहे.
युद्धाला सुरूवात करण्यापूर्वी काय चर्चा झाली याबद्दल ट्रम्प यांनी भाष्य केले. “मी पीट यांना फोन केला, मी जनरल केन यांना फोन केला. मी आपल्या अनेक दिग्गज लोकांशी चर्चा केली,” असे ट्रम्प म्हणाले. “आपल्यापुढे मध्यपूर्वेत एक समस्या आहे…. किंवा आपण थोडा काळ थांबून, मध्यपूर्वेत जाऊन ही मोठी समस्या संपवू शकतो,” असेही ट्रम्प पुढे बोलताना म्हणाले.
युद्धाची सुरूवात जरी संभ्रमात टाकणारी अली तरी, युद्ध सुरू झाल्यानंतरही प्रशासनाकडून देण्यात आलेले स्पष्टीकरण देखील स्पष्टता देणारे नाही. हेगसेथ यांच्याकडे इशारा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी काही तासांपूर्वीच दावा केली होता आखाती देशात इराणने प्रत्युत्तरादाखल केलेले हल्ले हे अनपेक्षित होते. “त्यांनी त्या सर्व देशांवर ज्या प्रकारे हल्ले केले ते किती अनपेक्षित होते पाहा, कोणीही त्याबद्दल विचारदेखील केला नव्हता,” असे ट्रम्प म्हणाले.
दरम्यान ट्रम्प यांच्या अनपेक्षित हल्ल्याबद्दलच्या या दाव्याशी विसंगत, इराणकडून संभाव्य प्रतिहल्ले होऊ शकतात याबद्दल अंतर्गत इशारा आधीच मिळाला होता, मात्र त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे वृत्त रॉयटर्सने दिले होते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील ऊर्जा प्रकल्पांवरील संभाव्य हल्ले पाच दिवस लांबणीवर टाकण्याची घोषणा सोमवारी केली. होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणच्या ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. इराणने मात्र ट्रम्प यांच्या घोषणेला अमेरिकेची माघार म्हणून संबोधले. ‘अमेरिका आणि इराणमध्ये अतिशय चांगली आणि सकारात्मक चर्चा झाली. युद्धावर पूर्ण तोडगा यातून निघेल. ही चर्चा आठवडाभर चालेल,’ असा दावा ट्रम्प यांनी समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये केला. पण इराणमध्ये कोणाशी चर्चा केली गेली, याचे तपशील त्यांनी दिले नाहीत.
इराणने अमेरिकेशी चर्चा झाल्याचे वृत्त फेटाळले. मात्र, त्यापूर्वी इराणचे अब्बास अराघची यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांच्याशी चर्चा केली. अमेरिका आणि इराण यांच्यात चर्चेसाठी तुर्की मध्यस्थी करत आहे. युद्धाचा हा चौथा आठवडा असून, संघर्षात दोन हजारांवर जणांचा बळी गेली आहे.
