Donald Trump signals winding down Iran war operations : गेल्या तीन आठवड्यांपासून इराणविरोधात चालू असलेले युद्ध आता संपण्याचे संकेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले आहेत. इराणविरुद्धच्या युद्धात अमेरिका आपली उद्दिष्टे साध्य करण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे, असं डोनाल्ड ट्रम्प म्हणालेत. त्यांनी लष्करी मोहिमा थांबवण्याचे संकेत देतानाच, हॉर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आता इतर देशांनी घ्यावी, असं आवाहन केलं आहे.

शुक्रवारी ‘ट्रुथ सोशल’वरील एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी इराणविरुद्ध मिळालेल्या मोठ्या लष्करी विजयांचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले, “इराणच्या दहशतवादी राजवटीसंदर्भात मध्यपूर्वेतील आमचे मोठे लष्करी प्रयत्न थांबवण्याचा विचार करत असताना, आम्ही आमची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या अगदी जवळ पोहोचलो आहोत.” इराणची लष्करी क्षमता नष्ट करण्यासह त्यांनी अनेक यशांची यादी सादर केली. ट्रम्प म्हणाले, “इराणची क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे निकामी करणे, त्यांचा संरक्षण औद्योगिक तळ उद्ध्वस्त करणे आणि त्यांचे नौदल व वायुसेना संपवणे, हे आम्ही साध्य केले आहे.” तसेच, इराण कधीही अण्वस्त्रे विकसित करू शकणार नाही याची अमेरिका खात्री करेल, असेही त्यांनी नमूद केले.

वॉशिंग्टनने आपल्या प्रादेशिक मित्रराष्ट्रांची सुरक्षा सुनिश्चित केल्याचे सांगताना ट्रम्प यांनी लिहिले, “इस्रायल, सौदी अरेबिया, कतार, संयुक्त अरब अमिराती, बहरीन, कुवेत आणि इतरांसह आमच्या मध्यपूर्वेतील मित्रपक्षांना आम्ही सर्वोच्च पातळीवर संरक्षण दिले आहे.”

हॉर्मुझची जबाबदारी आता इतर देशांवर

हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवर अवलंबून असलेल्या देशांना तिची सुरक्षा हाती घेण्याचे आवाहनही डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहे. हे अमेरिकेच्या धोरणातील बदलाचे संकेत आहेत. “हॉर्मुझच्या सामुद्रधुनीचा वापर करणाऱ्या इतर देशांनी तिचे रक्षण आणि नियमन करणे आवश्यक आहे. अमेरिका त्याचे रक्षण करणार नाही!” असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, अमेरिका मदत करू शकते, पण त्याची गरज भासू नये. “जर विचारले गेले, तर आम्ही या देशांना त्यांच्या हॉर्मुझमधील प्रयत्नांमध्ये मदत करू, परंतु एकदा इराणचा धोका पूर्णपणे नष्ट झाला की याची गरज उरणार नाही.” हा मार्ग सुरक्षित करणे हे त्या देशांसाठी एक “सोपी लष्करी मोहीम” असेल, असेही ट्रम्प यांनी म्हटले.

सैन्य कपातीचे संकेत

आखाती प्रदेशात तणाव कायम असताना आणि हॉर्मुझमधील वाहतुकीत अडथळे येत असतानाही, ट्रम्प यांच्या विधानावरून अमेरिका थेट लष्करी सहभाग कमी करण्याच्या तयारीत असल्याचे दिसते. जागतिक ऊर्जा पुरवठ्यासाठी हा जलमार्ग अत्यंत महत्त्वाचा असून, जगातील तेल आणि वायूचा मोठा वाटा येथूनच वाहून नेला जातो. या मार्गावर सर्वाधिक अवलंबून असलेल्या देशांवर सुरक्षेचा भार सोपवण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न आहे. अमेरिकेने अद्याप अधिकृतपणे सैन्य माघारीची घोषणा केलेली नाही. मात्र अमेरिका आपले वर्चस्व कायम ठेवून थेट युद्धभूमीवरील सहभाग कमी करू इच्छिते, असे ट्रम्प यांच्या पोस्टमधून संकेत मिळत आहेत.