Donald Trump Iran War strategy analysis by Ian Bremmer: अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात चालू असलेल्या युद्धसमाप्तीसाठी आज पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये वाटाघाटीची चर्चा होत आहे. अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स आणि इराण व इस्रायलचे प्रतिनिधी या चर्चेसाठी पाकिस्तानात पोहोचले आहेत. ७ एप्रिल रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधीची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा फसवी असून ते पुढील लष्करी कारवाईसाठी वेळकाढूपणा करत आहेत, असा दावा राजशास्त्रज्ञ इयान ब्रेमर यांनी केला आहे.

इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीमध्ये ब्रेमर म्हणाले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे चर्चेच्या नावाखाली केवळ वेळकाढूपणा करत असावेत. जेणेकरून त्यांना इराणमध्ये सैन्य पोहोचवता येईल आणि इराणचे खार्ग बेट ताब्यात घेण्यासाठी ते जमिनीवरील कारवाई सुरू करू शकतील.

इराणमधील जमिनीवरील कारवाई अमेरिकन सैन्यासाठी सोपी नसेल, हे सांगत असताना ब्रेमर यांनी आशाही व्यक्त केली. ते म्हणाले, कदाचित ट्रम्प यांना युद्धामुळे निर्माण झालेला तणाव कमी करायचा असेल. कारण त्यांना देशाअंतर्गत मोठ्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. तसेच या युद्धामुळे जगभरात भू-राजकीय आणि आर्थिक तणाव निर्माण झाला आहे. याचा दोष दुसऱ्यांवर ढकलण्याचा प्रयत्न ते करू शकतात.

ट्रम्प यांनी या संघर्षाबाबत बोलताना अनेकता तेल आणि सामरिक मालमत्तेचा उल्लेख केला आहे. यावरून त्यांचे हे दीर्घकालीन उद्दिष्ट असल्याचे दिसते. “जमिनीवरील हल्ला करण्यासाठी जोपर्यंत ते त्या प्रदेशात सैन्य तैनात करत नाहीत, तोपर्यंत ट्रम्प केवळ बाजारात तेजी ठेवण्याचा आणि तेलाच्या वाढलेल्या किमती खाली आणण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच त्यांना इराणच्या खार्ग बेटावर नियंत्रण मिळवायचा आहे, जिथून ९० टक्के इराणी तेलाची निर्यात होते.

Donald Trump on Hormuz strait
होर्मुझची सामुद्रधुनी बिनशर्त खुली करावी, अशी ट्रम्प यांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे.

होर्मुझ सामुद्रधुनी भविष्यात पूर्णपणे उघडण्याची शक्यता कमी

ब्रेमर पुढे असेही म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना हे युद्ध पुन्हा सुरू करायचे नाही. तसेच हा संघर्ष वाढावा असेही त्यांना वाटत नाही. इराणला त्यांनी दिलेल्या पूर्वीच्या धमक्या पाहिल्या तर त्या कधीही विश्वासार्ह नव्हत्या. इराणच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर संघर्ष वाढवल्यास व्यापक प्रादेशिक प्रत्युत्तर मिळू शकते आणि गोष्ट अमेरिकेला टाळायची आहे.

मात्र होर्मुझची सामुद्रधुनीमधील अस्थिरतेमुळे दीर्घकाळ चालणाऱ्या आर्थिक व्यत्ययाचा इशारा ब्रेमर यांनी दिला. ते म्हणाले, नजीकच्या काळात सामुद्रधुनी पूर्णपणे उघडली जाईल, असे मला वाटत नाही. याचे दूरगामी आर्थिक परिणाम भोगावे लागतील.

आजच्या चर्चेतून मार्ग निघणार?

इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराणचे शिष्टमंडळ दाखल झाले असून आज सकाळी पाकिस्तानच्या मध्यस्थीने दोन्ही राष्ट्रांत ऐतिहासिक चर्चा होणार आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा क्षेत्राला बाधा आल्याने या चर्चेत काय वाटाघाटी होतात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. उपाध्यक्ष व्हान्स यांच्याबरोबर ट्रम्प यांचे विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर हेदेखील आहेत. इराणबरोबर अप्रत्यक्ष वाटाघाटीच्या तीन फेर्‍यांमध्ये कुशनर सहभागी झाले होते.