Donald Trump Iran War Threat: इराण अमेरिकेच्या चर्चेच्या प्रयत्नांना आवश्यक प्रतिसाद देत नसल्याने चवथाळलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी, “आज रात्री संपूर्ण विनाश होईल”, अशी गंभीर स्वरुपाची धमकी दिली आहे. इराणने मात्र पूर्वीचा सूर कायम ठेवत धमकीला जुमानणार अशी भूमिका घेतली आहे. अशात ट्रम्प यांनी दिलेली मुदत समाप्त होत आली असताना इराणने अमेरिकेबरोबरचा सर्व संवाद पूर्णपणे थांबवला आहे. इराणी वृत्तसंस्था ‘तेहरान टाइम्स’ने मंगळवारी याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

इराणकडून संवाद पूर्णपणे बंद

होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्यासाठी ट्रम्प यांनी दिलेल्या मुदतीचे आता काही तास शिल्लक आहेत. ट्रम्प यांच्या मागण्यांना इराणने हवा तसा प्रसिसाद दिलेला नाही. दरम्यान, आता अमेरिकेबरोबर सुरु असलेला सर्व प्रकारचा संवाद तेहरानने पूर्णपणे बंद केला आहे. ‘तेहरान टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अमेरिकेसोबतचे सर्व राजनैतिक आणि अप्रत्यक्ष संवाद मार्ग बंद केले आहेत. दोन्ही देशातील संवाद बंद झाल्याने आता संघर्ष कोणते वळण घेणार याकडे सर्व जगाचे लक्ष लागले आहे.

शांततेच्या चर्चा निष्फळ

अमेरिकेने इराणबरोबर संवाद साधण्याचे अनेक प्रयत्न केले. पाकिस्तानने दोन्ही देशांत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवल्यानंतर ट्रम्प यांनी १५ कलमी शांतता प्रस्ताव इराणसमोर मांडला. इराणने मात्र, अमेरिकेचा प्रस्ताव वास्तवाला धरुन नसल्याचे सांगत धुडकावून लावला. यानंतर इराणने सुरुवातील सात आणि नंतर पाच अटी अमेरिकेसमोर ठेवल्या मात्र, प्रत्येकवेळी झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या. अखेर आक्रमक झालेल्या ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा देत, अर्वाच्य भाषेचा वापर केला.

युद्ध काय वळण घेणार?

काही वेळापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट धमकी देत संपूर्ण विनाश करण्याचा इशारा दिला आहे. ट्रम्प यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर सर्व जगाची धास्ती वाढली आहे. ४७ वर्षांचा भ्रष्टाचार, खंडणी यांचा आज रात्री विनाश होईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. यामुळे ट्रम्प नक्की कोणते निर्णायक पाऊल उचलणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, इराणने संवादाची सर्व माध्यमं बंद केल्याने एक महिन्यापासून सुरु असणारे युद्ध नेमके काय वळण घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.