Donald Trump links Ukraine military aid to Europe’s participation in the Iran conflict and Strait of Hormuz safety : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा युरोपीय मित्रराष्ट्रांना इशारा दिला आहे. जोपर्यंत हे देश होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी मदत करत नाहीत, तोपर्यंत आपण युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा थांबवू असे ट्रम्प म्हणाले आहेत. फायनान्शिअल टाइम्सने बुधवारी यासंबंधी वृत्त दिले आहे.

अमेरिकेने सुरुवातीला नाटो देशांच्या नौदलाकडे होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यासाठी मदत मागितली होती, पण अशी मदत नाकारण्यात आली. नाटोमधील सदस्य देशांनी या संघर्षात सहभागी होण्यास नकार दिला. तसेच अनेक देशांनी युद्ध थांबत नाही तोपर्यंत हे अशक्य असल्याचे म्हटले.

त्यानंतर ट्रम्प यांनी नाटोच्या ‘प्रायोरिटाइझ्ड युक्रेन रिक्वायरमेंट्स लिस्ट’ (PURL) उपक्रमाला लष्करी साहित्याचा पुरवठा थांबवण्याची धमकी दिली. फायनान्शिअल टाइम्सच्या रिपोर्टनुसार, या उपक्रमाद्वारे युक्रेनसाठी शस्त्रास्त्रांची खरेदी केली जाते आणि यासाठी युरोपीय देशांकडून निधी दिला जातो.

या धमकीनंतर नाटोचे सेक्रेटरी-जनरल मार्क रुट्ट (Mark Rutte) यांच्या विनंतीवरून, फ्रान्स, जर्मनी आणि युकेसह इतर देशांनी १९ मार्च रोजी एक निवेदन प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करण्याची तयारी दर्शवली, असे या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

रुट्ट यांनीच या संयुक्त निवेदनासाठी आग्रह धरला होता, कारण ट्रम्प यांनी PURL मधून आणि एकूणच युक्रेनमधून माघार घेण्याची धमकी दिली होती,” अशी माहिती याबद्दल माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने फायनान्शिअल टाइम्सशी बोलताना दिली. त्यांनी पुढे असेही सांगितले की, हे संयुक्त निवेदन इतक्या घाईत तयार करावे लागले, यावर स्वाक्षरी करण्यासाठी सर्व देशांना बोलवण्यासाठीही पुरेसा वेळ मिळाला नाही. त्यामुळे काही देशांना यामध्ये नंतर सहभागी व्हावे लागले.

हे निवेदन जारी करण्याच्या दोन दिवस आधी रुट्ट यांनी ट्रम्प आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्याबरोबर फोनवरून अनेकदा संवाद साधाला, असे इतर दोन अधिकाऱ्यांनी सांगितले.

एकिकडे अमेरिका युक्रेनला मदत करत असताना, युरोपातील मित्रराष्ट्र मात्र अमेरिकेच्या इराणविरोधातील ‘ऑपरेशन एपिक फ्युरी’मध्ये मदत करत नसल्याबद्दल ट्रम्प यांनी वारंवार टीका केली आहे.

“आम्ही नाटोचे संरक्षण करण्यासाठी तेथे आहोत, रशियापासून त्यांचा रक्षणासाठी आहोत. पण ते आमच्या संरक्षणासाठी तिथे नाहीत,” असे ट्रम्प गेल्या आठवड्यात म्हणाले होते. तसेच ट्रम्प यांनी ते नाटोमधून बाहेर पडण्याचा गांभिर्याने विचार करत असल्याचेही स्पष्ट केले आहे.

अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धामुळे युक्रेनला होणारा अमेरिकन लष्करी साहित्याचा पुरवठा कुठल्याही अडथळ्यांशिवाय सुरू असल्याचे शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र यावेळी त्यांनी युक्रेनसाठी असलेले शस्त्रास्त्र अमेरिका दुसरीकडे वळवू शकते, ही शक्यता मात्र त्यांनी नाकारली नाही.

“जर आम्हाला अमेरिकेसाठी काही हवे असेल आणि ते अमेरिकन असेल, तर आम्ही ते पहिल्यांदा अमेरिकेसाठी ठेवू,” असे रुबिओ म्हणाले.