वृत्तसंस्था, दुबई
इराणविरोधातील युद्ध केव्हा संपणार, या बाबतचा संभ्रम कायम असून, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता दोन ते तीन आठवड्यांत आम्ही इराणमधून बाहेर पडू, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे आणखी दोन ते तीन आठवडे युद्ध सुरू राहण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या मदतीला मित्रदेश न आल्याची खंत ट्रम्प यांनी पुन्हा बोलून दाखविली. दरम्यान, बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी) युद्धासंदर्भात ट्रम्प अमेरिकेला संबोधणार आहेत.
त्यापूर्वी, व्हाइट हाउस येथे पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. युद्ध संपण्यासाठी राजनैतिक पातळीवरील चर्चा यशस्वी ठरण्याची अट असेल का, असे विचारले असता ट्रम्प यांनी इराणला कुठलाही करार करावा लागणार नाही, असे उत्तर दिले. ‘माझ्याबरोबर त्यांना करार करावा लागणार नाही,’ असे ते म्हणाले.
इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अमेरिकेचे पश्चिम आशियासाठीचे प्रतिनिधी स्टीव्ह विटकॉफ यांचा फोन आल्याची माहिती दिली. मात्र, अमेरिकेबरोबर कुठल्याही प्रकारच्या थेट वाटाघाटी सुरू नसल्याचे ते म्हणाले. ‘अमेरिकेबरोबर चर्चा करून काही निष्पन्न होईल, यावर इराणचा विश्वास राहिलेला नाही. अमेरिकेवरची विश्वासार्हता शून्य झाली आहे.’
आम्ही लवकरच (इराण) तेथून बाहेर पडू. दोन ते तीन आठवड्यांचा कालावधी त्यासाठी लागेल. अमेरिकेचे लष्कर दोन ते तीन आठवड्यांत इराणमधील मोहीम संपवेल आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीवर जे देश अवलंबून आहेत, त्यांच्यावर ती खुली करण्याची जबाबदारी असेल. – डोनाल्ड ट्रम्प, अध्यक्ष, अमेरिका
इराणशी तुम्ही धमकी आणि कालमर्यादा राखण्याच्या भाषेत बोलू शकत नाहीत. अमेरिका जमिनीवरून हल्ला करण्याचे धाडस करणार नाही. तसे केले, तर त्यांची मोठी जीवितहानी होईल. – अब्बास अराघची, परराष्ट्रमंत्री, इराण
‘होर्मुझ’वर ब्रिटनमध्ये शिखर परिषद
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्यासाठी राजनैतिक पातळीवर परिषदेचे ब्रिटनमध्ये आयोजन केल्याची माहिती पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी दिली. या सामुद्रधुनीतून जाणारा मार्ग सुरक्षित राखण्यासाठीची कटिबद्धता ३५ देशांनी दर्शविली आहे.
लेबनॉनची सुरक्षा दले सीमेवरील शहरांतून मागे
इस्रायलने जमिनीवरून आक्रमण सुरू ठेवल्याने सीमेवरील काही शहरांतून लेबनॉनची सुरक्षा दले हटविण्यात आल्याची माहिती लेबनॉनच्या लष्कराने दिली आहे. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमधील लितानी नदीपर्यंतचा भाग सुरक्षा क्षेत्र म्हणून जाहीर केला आहे. या ठिकाणी हेजबोलाबरोबर इस्रायलची लढाई सुरू आहे. येथील सुमारे १० लाख नागरिकांचे गेल्या महिनाभरात विस्थापन झाले आहे.
ट्रम्प यांच्या विधानांमुळे संभ्रम कायम
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्याने वेगवेगळ्या प्रतिक्रियांमुळे इराणविरोधातील युद्धाबाबत संभ्रम कायम आहे. अमेरिकेचे काही हजार सैनिक पश्चिम आशियात तैनात आहेत आणि आणखी काही सैनिक या ठिकाणी जात आहेत. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर ६ एप्रिलनंतर इराणमधील ऊर्जाक्षेत्रांना लक्ष्य करण्याची धमकी त्यांनी दिली होती. तसेच, इराणच्या खर्ग बेटावरही हल्ला करण्याची धमकी दिली होती. इराणशी बोलणी सुरू असल्याचे दावेही त्यांनी केले. मात्र, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत त्यांनी यापूर्वी केलेल्या वक्तव्यापासून यू-टर्न घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
यूएईमध्ये इराणी नागरिकांना प्रवेशबंदी
संयुक्त अरब आमिरातीने इराणच्या नागरिकांना देशात प्रवेश करण्यास अथवा प्रवासादरम्यान देशातून दुसरीकडे जाण्यास मनाई केली आहे. ‘यूएई’च्या तीन मोठ्या विमान कंपन्यांनी ही माहिती दिली. ‘एमिरेट्स’, ‘एतिहाद’ आणि ‘फ्लाय दुबई’ या विमान कंपन्यांनी ही घोषणा केली.
अन्य घडामोडी
– उत्तर इराकमधील ब्रिटिश कंपनीशी निगडित तेलाच्या गोदामावर ड्रोन हल्ला
– तेल वाचविण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या सरकारचे आवाहन
– इराणच्या क्रूझ क्षेपणास्त्रांकडून कतारचा तेल टँकर लक्ष्य, कुवेतच्या विमानतळावरही हल्ला.
– इस्रायलच्या दक्षिणेकडे येमेनमधील हुथी बंडखोरांचा क्षेपणास्त्रांचा मारा
– इस्रायलचे इराणवर आतापर्यंत आठशेहून अधिक ठिकाणांवर हल्ले. आणखी पाच हजार लक्ष्य निर्धारित निर्धारित केल्याची माहिती.
इराणला युद्धसमाप्ती हवी, ट्रम्प यांचा दावा
वृत्तसंस्था, वॉशिंग्टन, दुबई, जेरुसलेम
इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांना युद्धसमाप्ती हवी आहे, असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी केला. ट्रम्प बुधवारी रात्री (भारतीय वेळेनुसार गुरुवारी सकाळी) अमेरिकी जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमावरून यासंबंधी वक्तव्य केले. मात्र, ट्रम्प यांचे विधान खोटे आणि निराधार आहे असे उत्तर इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले.
दरम्यान, ‘यूएसएस जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश’ ही विमानवाहू युद्धनौका पश्चिम आशियाकडे पाठवली जात असून त्याबरोबर तीन विनाशिका असतील, अशी माहिती अमेरिकेच्या दोन अधिकाऱ्यांनी दिली. या युद्धनौकेवर सहा हजारांपेक्षा अधिक नाविक असल्याचे त्यांनी सांगितले. ८२व्या एअरबोर्न डिव्हिजनकडून यापूर्वीच हजारो सैनिक पश्चिम आशियामध्ये तैनात केले जात आहेत. त्यांच्या जोडीला आणखी नौसैनिक पाठवले जात आहेत.
