Donald Trump Warns to Iran : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणविरुद्ध आक्रमक पवित्रा घेत जगाला हादरवले आहे. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, अमेरिकन सैन्य अवघ्या एका रात्रीत इराणला नकाशावरून पुसून टाकण्याची क्षमता ठेवते. इराणला दिलेला १० दिवसांचा अल्टिमेटम संपत असतानाच, ट्रम्प यांनी मंगळवारी रात्री ८ वाजेची (ईस्टर्न टाइम) ‘डेडलाईन’ निश्चित केली आहे. जर इराणने जागतिक तेल व्यापारासाठी महत्त्वाची असलेली होरमुझची सामुद्रधुनी खुली केली नाही, तर इराणमधील वीज प्रकल्प आणि पुलांवर भीषण बॉम्बफेक केली जाईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.

इस्लामिक राष्ट्र असलेल्या इराणने ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ (Strait of Hormuz) पुन्हा खुली न केल्यास आणि मंगळवारपर्यंत युद्धविराम करारावर चर्चा न केल्यास, इराणच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्याची धमकी ट्रम्प यांनी दिली आहे. ट्रम्प यांनी तेहरानला अण्वस्त्रे सोडून देण्यास आणि तेल वाहतुकीचा महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा सुरू करण्यास सांगितले आहे.

व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रम्प म्हणाले, “संपूर्ण देश एका रात्रीत नष्ट केला जाऊ शकतो आणि ती रात्र मंगळवारची असू शकते. मला आशा आहे की मला असे पाऊल उचलावे लागणार नाही.” पत्रकारांनी विचारले की इराणच्या नागरी वीज प्रकल्पांवर हल्ला करणे हा ‘युद्ध गुन्ह्या’चा (War Crime) भाग ठरेल का, तेव्हा ट्रम्प यांनी तो दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, “मला त्याची काळजी नाही. तुम्हाला माहित आहे युद्ध गुन्हा काय असतो? अण्वस्त्र बाळगणे हा युद्ध गुन्हा आहे.”

ट्रम्प यांनी त्यांच्या ‘ट्रुथ सोशल’ पोस्टमध्ये म्हटले आहे की, मंगळवारचा दिवस इराणमध्ये “पॉवर प्लांट डे आणि ब्रिज डे” (वीज प्रकल्प आणि पुलांचा दिवस) म्हणून ओळखला जाईल.

धाडसी बचाव मोहीम

इराणच्या सैन्याने अमेरिकेचे F-15E स्ट्राईक ईगल फायटर जेट पाडल्यानंतर, एका गंभीर जखमी आणि अत्यंत शूर अमेरिकन सैनिकाची यशस्वी सुटका करण्यात आल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. ही बचाव मोहीम अत्यंत धोकादायक आणि दुर्मिळ असल्याचे त्यांनी सांगितले. ‘ड्यूड 44 ब्राव्हो’ (Dude 44 Bravo) अशी ओळख असलेल्या हा वैमानिक इराणच्या डोंगराळ भागात लपला होता. ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन कॅमेरा लिंकद्वारे या वैमानिकाची हालचाल टिपली जात होती. “हे गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधण्यासारखे होते,” असे ट्रम्प यांनी या मोहिमेचे वर्णन करताना म्हटले.

CIA ची फसवणूक मोहीम

या मोहिमेत शेकडो अमेरिकन जवान सामील होते, जेणेकरून इराणी सैन्याला त्या वैमानिकाचा पत्ता लागू नये. सीआयए (CIA) चे संचालक जॉन रॅटक्लिफ यांनी सांगितले की, एजन्सीने एक “फसवणूक मोहीम” (Deception Campaign) राबवली होती, त्यामुळे तेहरानला असे वाटले की वैमानिक दुसऱ्याच ठिकाणी आहे. शुक्रवारी विमान पाडल्यानंतर रविवारी सकाळी या वैमानिकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले. रॅटक्लिफ म्हणाले, “अमेरिकेचा एक सर्वोत्तम आणि शूर सुपुत्र जिवंत असून तो डोंगराच्या कपारीत लपलेला आहे, याची पुष्टी सीआयएला मिळाली होती. तो शत्रूसाठी अदृश्य होता, पण सीआयएसाठी नाही.”