अमेरिकेच्या राष्ट्रीय दहशतवादी विरोधी केंद्राचे संचालक जो केंट यांनी अमेरिकेने इराणवर केलेल्या हल्ल्यांवर टीका करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर आता व्हाईट हाऊसने बुधवारी या प्रकरणात सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. केंट हे इराणवरील लष्करी कारवायांसंबंधी निर्णय प्रक्रियेचा भाग नव्हते, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. तसेच प्रशासनातील माहिती लीक करणाऱ्या संशयित व्यक्तीचा शोध घेण्यासाठी अंतर्गत चौकशी केली जात असल्याच्या वृत्तालाही यावेळी दुजोरा देण्यात आला.

राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्राच्या प्रमुख पदाचा राजीनामा देणारे जो केंट हे इराण मोहिमे संबंधीत कोणत्याही चर्चेत भाग नव्हते, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी सांगितले. एकंदरीत याद्वारे केंट हे निर्णय प्रक्रियेत कुठेही नव्हते असे दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

न्यूयॉर्क पोस्टच्या दिलेल्या वृत्तानुसार, व्हाईट हाऊसचे माजी डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ टेलर बुडोविच यांनी असा आरोप केला आहे की, जो केंट यांचे नाव राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती लीक करण्याच्या प्रकरणांत वारंवार समोर आले होते आणि त्यांचे वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांशी मतभेद झाले होते. इतकेच नाही तर केंट यांनी कदाचित स्वत:च्या इच्छेने राजीनामा दिला नसावा, असेही त्यांनी सुचवले, तसेच केंट यांना आधीच पदावरून हटवण्याची तयारी सुरू होती, असा दावाही बुडोविच यांनी केला. मात्र, बुडोविच यांनी या कथित लीक्सबद्दल अधिक माहिती दिली नाही.

या आरोपांना व्हाईट हाऊसने सार्वजनिकरित्या अद्याप दुजोरा दिलेला नाही, पण असे सूचित केले की अनाधिकृतपणे माहिती उघड करणारा स्त्रोत शोधून काढणे ही आता त्यांची प्राथमिकता आहे.

केंट राजीनामा देताना काय म्हणाले?

जो केंट यानी इराण विरोधात सुरू असलेल्या युद्धामुळे आपण खूप विचारविनिमय करून हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले होते. “इराणकडून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका उद्भवला नव्हता. हे युद्ध इस्रायलच्या दबावामुळे सुरू करण्यात आले,” असे केंट म्हणाले.

“इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धाला मी पाठिंबा देऊ शकत नाही. इराणचा आपल्या देशाला कोणताही धोका नव्हता. इस्रायलच्या आणि अमेरिकेतील शक्तीशाली लोकांच्या दबावाला बळी पडून आपण हे युद्ध सुरू केले, हे आता उघडच आहे”, अशी भावना केंट यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात व्यक्त केली आहे.

दरम्यान व्हाईट हाऊसने हे दावे फेटाळून लावत ते खोटे असल्याचे म्हटले आहे. केंट यांच्या राजीनाम्यावर ट्रम्प यांनी देखील प्रतिक्रिया दिली. “मला नेहमी वाटायचं की सुरक्षेच्या बाबतीत तो खूपच कमकुवत आहे. मी त्याला फारसा ओळखत नव्हतो. पण तो एक चांगला माणूस वाटतो. पण मी त्याचं निवेदन वाचलं, तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यानं राजीनामा दिला हे चांगलंच झालं, कारण इराणपासून कोणताही धोका नाही असे तो म्हणाला आहे. अशा लोकांची आम्हाला गरज नाही”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली.