लंडन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना ब्रिटनमध्ये बनवलेल्या ‘एचएमएस ट्रम्प’ या दुसर्या महायुद्धातील पाणबुडीची मूळ घंटा किंग चार्ल्स तिसरे यांनी भेट म्हणून दिली. मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित मेजवानीवेळी किंग चार्ल्स यांनी ही भेटवस्तू जाहीर केली. या वेळी त्यांनी आपल्या औपचारिक भाषणात मैत्रीपूर्ण आणि विनोदी शैलीत ट्रम्प यांचे कौतुक केले. यानंतर भारावलेल्या ट्रम्प यांनीही किंग चार्ल्स तिसरे यांचे भरभरून कौतुक केले.
किंग चार्ल्स तिसरे म्हणाले, की ‘१९४४ मध्ये ब्रिटनमधून ‘एचएमएस ट्रम्प’ या पाणबुडीचे अनावरण झाले होते, जिने युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. महोदय, तुमच्याच नावाच्या त्या शूर पाणबुडीची मूळ घंटा तुम्हाला भेट देताना मला आनंद होत आहे. ही आपल्या देशांच्या सामायिक इतिहासाची साक्ष आहे. जर तुम्हाला कधी आमची गरज भासली, तर फक्त एक फोन करा.’ किंग चार्ल्स यांच्या या विधानानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
