अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतःचं सोशल मीडिया नेटवर्क सुरू करणार आहेत. ट्रम्प यांनी बुधवारी यासंदर्भातील काही योजनांची घोषणा केली. “ट्रुथ सोशल” असे ट्रम्प यांच्या नेटवर्कचे नाव असेल. ट्रुथ सोशल हे ट्रम्प मीडिया अँड टेक्नॉलॉजी ग्रुपच्या (टीएमटीजी) मालकीचे असेल आणि पुढच्या महिन्यात काही ठराविक लोकांसाठी या नेटवर्कचा बीटा लाँच सुरू होण्याची शक्यता आहे. अॅपलच्या अॅप स्टोअरमध्ये हे प्री-ऑर्डरसाठी आधीच उपलब्ध आहे, असं टीएमटीजी ग्रुपने एका निवेदनात म्हटलंय.

यामध्ये व्हिडिओ ऑन डिमांड सेवेचाही समावेश असेल, ज्यात नॉन-व्होक मनोरंजन प्रोग्रामिंग देखील असेल. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवेदनात म्हटले आहे की, मी मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या अत्याचाराविरोधात उभं राहण्यासाठी ट्रम्प मीडिया आणि तंत्रज्ञान आणि ट्रुथ सोशल सुरू करत आहे. ट्रम्प पुढे म्हणाले की, आपण एखा अशा जगात राहतोय जिथे तालिबानी ट्विटर वापरू शकतात, मात्र सर्वांच्या आवडत्या माजी अमेरिकन अध्यक्षावर बंदी घालण्यात आली आहे. हे अस्वीकार्य आहे. दरम्यान, या वर्षाच्या सुरुवातीला कॅपिटल बिल्डिंगमध्ये ट्रम्प समर्थकांनी हिंसा केल्यानंतर ट्विटर आणि फेसबुकने कारवाई करत ट्रम्प यांच्या अकाउंटवर बंदी घातली होती.

“डील किंवा नो डील” आणि “अमेरिका गॉट टॅलेंट” चे कार्यकारी निर्माता स्कॉट सेंट जॉन हे या मीडिया नेटवर्कचे काम पाहतील.