Donald Trump Marine One: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर प्रवासी विमानाच्या खूप जवळून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. ट्रम्प यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वॉशिंग्टनमध्ये घडलेल्या या घटनेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प मरीन वन या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते त्यावेळी ही घटना घडली. याप्रकरणी आता अमेरिेकेच्या सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरु केला आहे.

ट्रम्प यांचे हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान जवळून गेले

समोर आलेल्या माहितीसानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांना घेऊन मरीन वन हेलिकॉप्टर हवाई दलाच्या तळावर उतरण्यासाठी निघाले होते. दरम्यान याचवेळी वॉशिंगटनमधील रिगन राष्टीय विमानतळावरुन प्रवासी विमानाने उड्डाण घेतले. ट्रम्प यांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर आणि प्रवासी विमान अगदी जवळून गेल्याने आता तपास यंत्रणांकडून चिंता व्यक्त केली जात आहे. हवेत असताना हेलिकॉप्टर आणि विमानाची धडक झाली असती तर मोठा अपघात झाला असता. दरम्यान, मोठी दुर्घटना टळल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

व्हाईट हाऊसकडून स्पष्टीकरण

डोनाल्ड ट्रम्प यांच्या जीवाला कोणाताही धोका नव्हता असे स्पष्टीकरण व्हाईट हाऊसकडून देण्यात आले आहे. हवाई वाहतूक नियंत्रण विभागाच्या संवादात गोंधळ निर्माण झाल्याने ही घटना घडल्याचे न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, राष्ट्रीय वाहतूक आणि सुरक्षा मंडळाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, याप्रकरणाचा तपास सुरु केला आहे. मरीन वन आणि रिगन विमानतळाच्या संवादात गोंधळ कशामुळे निर्माण झाला? याचा तपास केला जात आहे.

घटनेच्या तपासाचे आदेश

दरम्यान, ट्रम्प यांच्या मरिन वन हेलिकॉप्टरचे वैमानिक जगातिक सर्वोत्तम वैमानिकांपैकी असल्याचे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कुश देसाई यांना म्हटले आहे. त्यामुळे ट्रम्प यांना कोणताही धोका निर्माण होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या घटनेला लॉस ऑफ सेपरेशन असे नाव देण्यात आले आहे. हवाई वाहतूक नियंत्रण विभागाने यावेळी दोन्ही विमानांच्या वैमानिकांमध्ये संवाद होता, असेही म्हटले आहे. दरम्यान, या घटनेचा सखोल तपास केला जाणार असल्याचे अमेरिकी प्रशासनाने म्हटले आहे. मंगळवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेमुळे चिंता व्यक्त करण्यात आली.