Modi US visit: दहशतवादाला थारा देऊ नका; ट्रम्प-मोदींनी पाकला ठणकावले

भारत आणि अमेरिका एकत्रितपणे दहशतवादाचा सामना करतील अशी ग्वाहीही दोन्ही नेत्यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प. (संग्रहित)

भारत आणि अमेरिकेने दहशतवादावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहे. दहशतवादाला थारा देऊ नका अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. पठाणकोट आणि २६/११ च्या हल्ल्यातील दोषींवर कठोर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. दहशतवाद आणि दहशतवाद्यांच्या आश्रयस्थान नष्ट करण्याचा निर्धारही या दोन्ही नेत्यांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची बहुचर्चित भेट सोमवारी रात्री (भारतीय वेळेनुसार) पार पडली. व्हाईट हाऊसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले. या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे जगभराचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीनंतर मोदी आणि ट्रम्प यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. दहशतावाद नष्ट करणे यावर आमचा भर असेल असे ट्रम्प यांनी सांगितले. आम्ही दहशतवाद, कट्टरतावाद यावर चर्चा केली असून याविरोधात एकमेकांना सहकार्य करण्यावर एकमत झाल्याचे मोदींनी सांगितले.

भारत एक अतुलनीय देश असून मोदींची व्हाईट हाऊसमधील उपस्थिती ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे असे ट्रम्प यांनी सांगितले. भारत हा अमेरिकेचा खरा मित्र असून भारताच्या अर्थव्यवस्थेचा वेगाने विकास होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अफगाणिस्तानमधील भारताच्या भूमिकेचे त्यांनी कौतुक केले. मोदींनीही ट्रम्प यांचे आभार मानले. भारत आणि अमेरिका हे जगाच्या विकासात इंजिन म्हणू काम करणार आहेत. ‘न्यू इंडिया’ आणि ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या मोहीम एकसमान आहे असे मोदींनी आवर्जून सांगितले. सक्षम अमेरिकेत भारताचेही हित असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, मोदी- ट्रम्प बैठकीत द्विपक्षीय संबंध, दहशतवाद, अफगाणिस्तानातील अस्थिरता अशा विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. या चर्चेत फर्स्ट अमेरिकेन आणि मेक इन इंडियाच्या या दोन देशांच्या दोन भिन्न धोरणांवरही चर्चा करण्यात आली. या भेटीकडे चीन, पाकिस्तानसह सगळ्या जगाची नजर होती.

नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सहपरिवार भारतात येण्याच निमंत्रण दिले. त्यामुळे या भेटीचा आता दोन्ही देशांना फायदा होणार आहे. तसेच द्विपक्षीय सुधारण्यास मदतही होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Donald trump meets narendra modi white house