इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनानंतर तिथे सध्या आठवडाभराचा शासकीय दुखवटा आणि अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवर जोरदार निशाणा साधला आहे. “आम्ही मनाने चांगले म्हणून, आम्ही त्यांना एका अंत्यविधीसाठी आठवडाभराची सुट्टी दिली,” असा खोचक टोला ट्रम्प यांनी लगावला.

अमेरिकेच्या २५० व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला माऊंट रशमोअर येथे आयोजित एका मोठ्या जाहीर सभेत ट्रम्प बोलत होते. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर उपस्थित जनसमुदायाने टाळ्या आणि हशा पिकवला.

‘इराणची आता तडजोड करण्याची प्रचंड इच्छा’

“आम्ही इराणला चांगलाच धडा शिकवला. ते आता तडजोड करण्यासाठी आतुर झाले आहेत. त्यांना तडजोड करण्याची प्रचंड इच्छा आहे. आम्ही मनाने चांगले म्हणून, आम्ही त्यांना एका अंत्यविधीसाठी आठवडाभराची सुट्टी दिली,” असे ट्रम्प गर्दीला संबोधित करताना म्हणाले. राष्ट्राध्यक्षांच्या या मिश्किल वक्तव्यावर उपस्थितांनी जल्लोष केला आणि मिश्किलपणे हसले.

खामेनींचा मृत्यू आणि प्रदीर्घ काळानंतर अंत्यसंस्कार

२८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांनाही जीव गमवावा लागला होता. मुस्लिम परंपरेनुसार २४ तासांच्या आत दफनविधी करणे गरजेचे असते. मात्र, युद्ध आणि सुरक्षेच्या कारणांमुळे इराण प्रशासनाने हा अंत्यसंस्कार लांबणीवर टाकला होता. गेल्या महिन्यात झालेल्या तात्पुरत्या युद्धविराम करारा नंतर आता हे अंत्यसंस्कार पार पडत आहेत.

इराणमध्ये आठवडाभराचा दुखवटा

शुक्रवारपासून तेहरानमधील ‘ग्रँड मोसल्ला’ येथे खामेनींचा पार्थिव अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. यावेळी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांच्यासह अनेक बडे नेते भावूक झाले होते. काळे कपडे परिधान करून हजारो नागरिक या शोकाकुळ वातावरणात सहभागी झाले आहेत.

खामेनी यांचे पार्थिव तेहरानहून ‘कोम’ या शहरात आणि त्यानंतर इराकच्या ‘नजफ’ व ‘कर्बला’ या शहरांमध्ये नेले जाईल. अंतिम दफनविधी ९ जुलै रोजी ‘मशहाद’ येथे पूर्ण शासकीय इतमामात त्यांचा दफनविधी केला जाईल. या अंत्यसंस्कारासाठी भारत, पाकिस्तान, रशिया आणि चीनसह अनेक देशांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत.

मोजताबा खामेनी अजूनही नजरेआड

फेब्रुवारीमध्ये वडिलांच्या निधनानंतर सर्वोच्च नेतेपदाची सूत्रे स्वीकारली, पण तेव्हापासून मोजताबा अद्याप सार्वजनिकरित्या समोर आलेले नाहीत. त्यांनी केवळ लेखी निवेदनांद्वारेच जनतेशी संवाद साधला आहे, त्यामुळे त्यांच्या आरोग्याविषयी आणि नेतृत्व करण्याच्या क्षमतेविषयी जनमानसात प्रश्न निर्माण होत आहेत.