Donald Trump On Mojtaba Khamenei: इराणचे सर्वोच्च नेते मोजताबा खामेनी यांच्या तब्येतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खामेनी अद्याप जिवंत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूनंतर मोजताबा यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाली. पण, या निवडीनंतरही मोजताबा सार्वजनिक ठिकाणी अथवा वडिलांच्या अंत्यसंस्काराच्यावेळीही दिसून आले नाहीत. यावरुन त्यांच्या तब्येतीबाबत विविध प्रश्न उपस्थित करण्यात आले. यानंतर आता ट्रम्प यांनी मोजताबा जिंवत असतील पण, गंभीर जखमी असल्याचे वक्तव्य केले आहे.
डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
ग्लेन बेक या रेडिओ होस्टला दिलेल्या टेलिफोनिक मुलाखतीत डोनाल्ड ट्रम्प मोजताबा खामेनी यांच्या तब्येतीबाबत वक्तव्य केले आहे. “मला नाही वाटत त्यांचा मृत्यू झाला असेल. ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या शरीराची डावी बाजू, हात, पाय सर्वच ठिकाणी, पण मला नाही वाटत त्यांचा मृत्यू झालाय”, असे डोनाल्ड ट्रम्प मुलाखतीत म्हणाले. “आणि खामेनी खरोखरच जिवंत नसतील, तर इराण उत्तम नाटक करतंय”, असेही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प पुढे म्हणाले.
ट्रम्प यांचे वक्तव्य
मोजताबा खामेनी आहेत कुठे?
अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी २०२६ रोजी इराणवर संयुक्त हल्ला केला. हल्ल्याच्या पहिल्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाला. खामेनी यांच्यासह त्यांच्या घरातील इतरांचा देखील यात मृत्यू झाला. दरम्यान, यावेळी मोजताबा खामेनी देखील गंभीर जखमी झाल्याचा दावा केला जातो. मोजताबा खामेनी यांची वडिलांच्या मृत्यूनंतर सर्वोच्च नेतेपदी निवड करण्यात आली मात्र, त्यांनी अद्याप सार्वजनिक ठिकाणी उपस्थिती दर्शवली नाही. यामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत उलट सुलट चर्चा सुरु होती.
काही दिवसांपूर्वी आला होता व्हिडीओ
काही दिवसांपूर्वी इराणी फार्स वृत्तसंस्थेने मोजताबा खामेनी यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला होता. या व्हिडीओची सत्यता समोर आली नाही मात्र मोजताबा या व्हिडीओत संवाद साधताना दिसत होते. मोजताबा खामेनी वडिलांच्या अंत्यसंस्कारावेळी देखील अनुपस्थित असल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा देखील दावा केला जात होता. दरम्यान, विविध आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार मोजताबा यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते तसेच, त्यांच्यावर उपचार सुरु असून, त्यांच्या ठिकाणाबाबतही नेमकी माहिती नसल्याचे सांगितले जाते.
