US-Iran War: अमेरिका आणि इराणमधील युद्धाबाबत दोन महिन्यांच्या कालावधीत देखील कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. काही दिवसांपूर्वी फक्त दोन्ही देशात युद्धविरामाची घोषणा करण्यात आलेली असली तरी दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढत असल्याने मध्य पूर्वेत पुन्हा एकदा युद्धाचे ढग गडद झाले आहेत. इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी ‘युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही’ अशी ठाम भूमिका मांडली. त्यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणवर चांगलेच भडकले आहेत.

मोजतबा खामेनी यांनी ‘युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही’, अशी ठाम भूमिका मांडल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा इशारा दिला आहे. ‘आम्ही युरेनियमचा साठा नष्ट करू, पण इराणला तो घेऊ देणार नाहीत. कोणत्याही परिस्थितीत इराणकडे अणुशस्त्र असणार नाही’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्ध पुन्हा भडकण्याची चिन्ह निर्माण झाले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष संपवण्यासाठी सध्या हालचाली सुरू आहेत. मात्र, इराणच्या युरेनियमच्या साठ्याचा मुद्दा वाटाघाटींमध्ये एक मोठा अडथळा असल्याचं बोललं जात आहे. याबाबतच इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी देशातील शस्त्रास्त्र आणि युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही, अशी ठाम भूमिका जाहीर केल्यानंतर इराण आणि अमेरिकेच्या शांतता कराराबाबत नवीन पेच निर्माण झाला आहे.

यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “अमेरिका इराणला समृद्ध युरेनियम स्वतःकडे ठेवू देणार नाही. इराण युरेनियमचा साठा स्वतःकडे ठेवू शकत नाही. आम्ही तो साठा मिळवू. आम्हाला त्या युरेनियमच्या साठ्याची गरजही नाही. आम्हाला ते नको आहे. पण तो आम्ही मिळवल्यानंतर नष्ट करू. मात्र, इराणला तो घेऊ देणार नाहीत”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

इराणबरोबरच्या कराराबाबत ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिका-इराणमधील सुरू असलेल्या शांतता कराराबाबतच्या चर्चा संदर्भात ट्रम्प यांनी सांगितलं की, “सध्या सुरू असलेल्या युद्धविराम प्रक्रियेअंतर्गत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र, तेहरानला अणुशस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही. सध्या आम्ही वाटाघाटी करत आहोत आणि पुढे काय होतं ते पाहू. कोणत्याही परिस्थितीत आम्ही इराणकडील युरेनियमचा साठा मिळवणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडे अणुशस्त्र असणार नाही.”

होर्मुझ सामुद्रधुनीबाबत डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

मध्य पूर्वेतील तणावामुळे होर्मुझ सामुद्रधुनीमधून होणाऱ्या जागतिक व्यापाराला मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे याचा परिणाम जगातील अनेक देशांवर होत आहे. याबाबत बोलताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “होर्मुझच्या सामुद्रधुनी भोवतीच्या निर्बंधांमुळे इराणचे दररोज सुमारे ५०० दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होत आहे. अमेरिकेला होर्मुझची सामुद्रधुनी आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीसाठी खुली आणि मुक्त राहावी असं वाटतं. आम्हाला ती खुली आणि मुक्त हवी आहे, आम्हाला टोल नको आहे.”

Donald Trump Mojtaba Khamenei Iran Uranium

“युरेनियमचा साठा देशाबाहेर जाणार नाही”, मोजतबा खामेनी

अण्वस्त्र कार्यक्रमावरुन सुरु असणाऱ्या वाटाघाटीतील कळीचा मुद्दा असलेल्या युरेनियमवर इराणने भूमिका स्पष्ट केली आहे. देशातील संवर्धित युरेनियमचा साठा इराणमध्येच राहिला पाहिजे, असे स्पष्ट आदेश सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांनी दिले आहेत. अण्वस्त्र निर्मितीसाठी युरेनियम अतिशय महत्वाचा मानला जातो आणि इराण सध्या शस्त्रास्त्र दर्जाच्या जवळपास पोहोचल्याने संवर्धित युरेनियम इराणमध्ये ठेवण्याची भूमिका मोजतबा यांनी घेतल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

युरेनियमबाबत मोजतबा यांनी स्पष्ट केली भूमिका

अमेरिका आणि इराण यांच्यात सुरु असलेल्या शांतता चर्चेत इराणचा आण्विक कार्यक्रम हा महत्वाचा मुद्दा आहे. इराणकडे कधीच अण्वस्त्र असू नये अशी अमेरिकेची भूमिका आहे. शिवाय इराणकडे असणारा संवर्धित युरेनियमचा साठा देखील आपल्याकडे सुपूर्द केला जावा अशी मागणी अमेरिकेने केली आहे. पण, मोजतबा यांनी युरेनियमचा साठा देशातच राहावा अशी भूमिका घेतल्याने दोन्ही देशांच्या चर्चेत पुन्हा गुंतागुंत वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

६० टक्क्यांपर्यंत युरेनियम संवर्धन केल्याचा दावा

इराणकडे युरेनियमचा साठा असल्याचा दावा वारंवार अमेरिका आणि इस्रायलकडून केला जात आहे. इराण गेल्या काही वर्षांपासून युरेनियमच्या संवर्धनाचे काम करत आहे. दरम्यान, आता इराण या युरेनियमच्या मदतीने अण्वस्त्र निर्मितीच्या जवळ पोहोचल्याचा दावा केला जात आहे. इराणच्या अण्वस्त्र निर्मिती क्षमतेबाबत वारंवार विविध दावे केले जातात. इराणने ६० टक्क्यांपर्यंत युरेनियम संवर्धन केल्याचा दावा करण्यात आला आहे. पण, इराणने सातत्याने अण्वस्त्र निर्मितीचे दावे फेटाळून लावले आहेत.

Donald Trump Iran Uranium

डोनाल्ड ट्रम्प अन् नेतान्याहू यांच्यात इराणवरून मतभेद?

डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेतान्याहू यांच्यात मंगळवारी इराणबाबत राजनैतिक संबंध पुन्हा सुरू करण्याच्या प्रयत्नांबाबत फोनवरून चर्चा झाली. यावेळी इराणबरोबरील वाटाघाटी पुढे चालू ठेवायच्या की पुन्हा लष्करी कारवाईकडे वळायचं? यावरून ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यात मतभेद झाले. वृत्तानुसार, ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी कतार आणि पाकिस्तानने इतर प्रादेशिक मध्यस्थांच्या पाठिंब्याने तयार केलेल्या सुधारित शांतता प्रस्तावावर देखील चर्चा केली. अमेरिका आणि इराण यांच्यातील दरी कमी करणं हा या प्रस्तावाचा उद्देश असल्याचं सांगितलं जातं. डोनाल्ड ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यातील फोनवरील संभाषणानंतर बेंजामिन नेतान्याहू यांच्या प्रतिक्रियेचं वर्णन करताना सूत्रांच्या मते नेतान्याहू हे खूप अस्वस्थ होते. यावेळी ट्रम्प यांनी इराणबरोबर अजूनही करार होऊ शकतो अशी आशा व्यक्त केली. तसेच वाटाघाटी अयशस्वी झाल्यास लष्करी हल्ल्यांचा पर्यायही उपलब्ध असल्याचं स्पष्ट केलं. मात्र, नेतान्याहू यांनी इराणबाबत अधिक कठोर लष्करी कारवाईच्या भूमिकेवर जोर दिला.