Donald Trump Decision To Deploy 2,000 National Guard Troops To Los Angeles: डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून बेकायदा स्थलांतरितांविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. यापूर्वी लाखो बेकायदा स्थलांतरितांना अमेरिकेतून त्यांच्या मायदेशी पाठवण्यात आल्यानंतर, आता आणखी अशा स्थलांतरितांची अमेरिकेच्या विविध राज्यांमध्ये शोधमोहीम सुरू आहे. अमेरिकन प्रशासनाच्या या कारवाईच्या विरोधात लॉस एंजेलिसमध्ये लाखो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत.

लॉस एंजेलिसमधील या आंदोलकांना रोखण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी गव्हर्नरच्या संमतीशिवाय नॅशनल गार्ड्स तैनात केले होते. नॅशनल गार्ड्स तैनात झाल्यानंतर तेथील परिस्थिती आणखी चिघळली असून आंदोलकही आक्रमक झाले आहेत. काल या स्थलांतरविरोधी कारवाईच्या आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात जाळपोळ केल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

आणखी २ हजार नॅशनल गार्ड्स तैनात करण्यास मान्यता

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या आंदोलनाविरोधात आणखी कठोर पाऊल उचलत लॉस एंजेलिसमध्ये अतिरिक्त २००० नॅशनल गार्ड्स तैनात करण्यास मान्यता दिली. तत्पूर्वी स्थलांतरविरोधी कारवाईच्या विरोधात लॉस एंजेलिसमध्ये सुरू असलेल्या गोंधळामुळे अमेरिकेच्या संरक्षण विभागाने सोमवारी नॅशनल गार्डला मदत करण्यासाठी सुमारे ७०० मरीन (लष्कराचे जवान) तैनात केले होते.

ट्रम्प विरुद्ध लॉस एंजेलिस गव्हर्नर

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी व केंद्रीय कर्मचारी आणि मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लॉस एंजेलिसमध्ये किमान ३०० नॅशनल गार्ड्स तैनात केले होते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी राज्याच्या परवानगीशिवाय नॅशनल गार्ड्स तैनात करण्याची १९६५ नंतरची ही पहिलाच घटना आहे.

कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ट्रम्प प्रशासनाला नॅशनल गार्ड्सच्या तैनातीचा आदेश मागे घेण्याची विनंती केली आहे. न्यूसम यांनी यावेळी ट्रम्प यांच्यावर राज्याच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करण्याचा आरोप केला आहे. “ही एका हुकूमशहाची कृत्ये आहेत, राष्ट्राध्यक्षांची नाही”, असे त्यांनी एक्स वर लिहिले आहे.

गव्हर्नर गॅविन न्यूसम यांना अटक होणार का?

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांच्यात तणाव वाढत आहे. याचबरोबर यांच्या गॅविन न्यूसम भूमिकवरून ट्रम्प त्यांच्यावर टीकाही करत आहेत. लॉस एंजेलिसमधील अशांतता हाताळता न आल्याबद्दल कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांना अटक करावी, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी सुचवले होते. याबाबत टाईम मॅगझिनने वृत्त दिले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याचबरोबर लॉस एंजेलिसमध्ये २००० नॅशनल गार्ड सैनिक तैनात करण्याच्या त्यांच्या निर्णयाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थन केले आणि म्हटले की यामुळे शहर “पूर्णपणे नष्ट” होण्यापासून वाचले. ट्रम्प यांनी कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम आणि लॉस एंजेलिसच्या महापौर करेन बास यांच्यावर टीका केली आणि ते अक्षम असल्याचे म्हटले आहे.