Donald Trump On US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू आहे. मात्र, या युद्धाचे परिणाम जगातील अनेक देशांवर होण्यास सुरूवात झाली आहे. मध्य पूर्वेतील युद्धामुळे जगाला होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाल्याने जगातील कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती असल्यामुळे कच्च्या तेलाच्या वाहतुकीला अडथळे निर्माण झाले आहेत.

अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या किंमती २०० डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. इराणमधील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. मात्र, अशी परिस्थिती असतानाही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या एका वक्तव्याची मोठी चर्चा रंगली आहे. ‘जेव्हा-जेव्हा तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा अमेरिका खूप पैसे कमवते’, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?

“अमेरिका हा जगातील सर्वात मोठा कच्चे तेल उत्पादक देश आहे. त्यामुळे जेव्हा-जेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात तेव्हा अमेरिका खूप पैसे कमवते. अमेरिकेला खूप मोठा फायदा होतो. तरीही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘धोकादायक शक्ती’ असलेल्या इराणला अण्वस्त्रे मिळवण्यापासून रोखणं. जे मध्य पूर्व आणि संपूर्ण जगाला धोका निर्माण करू शकतात. मात्र, मी असं कधीही होऊ देणार नाही”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Donald Trump On Crude Oil Prices
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य चर्चेत

“इराणवर हल्ला करण्यासाठी काही शिल्लक नाही”, ट्रम्प यांचे युद्ध संपवण्याचे संकेत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे संकेत दिले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं की इराणला लक्ष्य करण्यासाठी आता प्रत्यक्षात काहीही शिल्लक नाही आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील व्यापार व्यत्ययांमुळे कच्चे तेल आणि वायूच्या वाढत्या किंमतींच्या चिंतेमुळे हे युद्ध लवकरच संपवू शकतं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध लवकरच संपणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “इराणशी सुरु असलेलं युद्ध लवकरच संपेल. कारण आता इराणमध्ये लक्ष्य करण्यासाठी व्यावहारिकदृष्ट्या काहीही शिल्लक नाही. थोडं फार काही शिल्लक असेल. त्यामुळे मी जेव्हा हे युद्ध संपवेल तेव्हा ते संपेल”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीरपणे युद्ध संपवण्याचे संकेत दिले असले तरी इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी मात्र युद्ध सुरूच राहणार असल्याचं म्हटलं आहे. इस्रायली संरक्षण मंत्री इस्रायल कॅट्झ यांनी बुधवारी म्हटलं की, “हे युद्ध कोणत्याही वेळेच्या मर्यादेशिवाय आणि आवश्यकतेनुसार जोपर्यंत आमचं सर्व उद्दिष्टे साध्य करत नाही आणि ही मोहीम निर्णायकपणे जिंकत नाही तोपर्यंत हे युद्ध चालू राहील.”