Donald Trump on Greenland : दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला की, ग्रीनलँडचे रक्षण करण्याची क्षमता ही युनायटेड स्टेट्सशिवाय इतर कोणत्याही देशात नाही. तसेच ट्रम्प यांनी ग्रीनलँड हा धोरणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा भूभाग असल्याचे म्हटले आहे.
जागतिक नेत्यांना संबोधित करताना, ट्रम्प म्हणाले की, भूतकाळात ग्रीनलँड देऊन टाकणे मूर्खपणाचे होते. तसेच त्यांनी दावा केला की डेन्मार्क हा देश स्वत:हून या बेटाचे संरक्षण करण्यास सक्षम नाही. तसेच भाडेतत्वावर असलेल्या ग्रीनलँडचे ते संरक्षण करू शकणार नाहीत, असेही ट्रम्प यावेळी म्हणाले.
यावेळी ग्रीनलँडचा उल्लेख ‘एक बर्फाचा तुकडा’ असा केला. पुढे ट्रम्प यांनी युक्तीवाद केला की या प्रदेशाच्या धोरणात्मक महत्त्व पाहाता, त्यावर नियंत्रण मिळवण्याची मागणी किमान स्वरुपाची होती.
ट्रम्प म्हणाले की, “पण आता मी ज्या गोष्टीची मागणी करत आहे, तो फक्त एक आईस-कोल्ड तुकडा आहे आणि तो अशा वाईट ठिकाणी येतो की तो जागतिक शांतता आणि जगाच्या संरक्षणासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. आपण त्यांना गेल्या अनेक दशकांपासून जे काही देत आलो आहोत, त्या तुलनेत ही मागणी अत्यंत छोटी आहे.”
ट्रम्प यांनी यावरही जोर दिला की, फक्त अमेरिकेकडेच अशी लष्करी आणि लॉजिस्टिक क्षमता आहे, जी ग्रीनलँडची सुरक्षा सुनिश्चित करू शकते.
ग्रीनलँडचा ताबा मिळवण्यासाठी बळाचा वापर केला जाण्याची शक्यताही ट्रम्प यांनी फेटाळून लावली, मात्र त्यांनी इतर दुसरा कोणताही देश या भूभागाचा ताबा मिळवू शकत नाही असेही ट्रम्प यांनी दावोस येथील भाषणात स्पष्ट केले .
स्वित्झर्लंडमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत बोलताना ट्रम्प म्हणाले की, “लोकांना वाटले होते की मी बळाचा वापर करेन, पण मला बळाचा वापर करण्याची आवश्यकता नाही. मला बळाचा वापर करायचा नाही. मी बळाचा वापर करणार नाही.”
ट्रम्प यांनी असेही ठामपणे सांगितले की, ग्रीनलँडच्या मुद्द्यावर जे ‘नाही’ म्हणाले त्यांना ते विसरणार नाहीत. ते म्हणाले, “तुम्ही हो म्हणू शकता किंवा नाही म्हणू शकता, पण आम्ही ते लक्षात ठेवू.”
दरम्यान ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे ग्रीनलँडच्या भू-राजकीय महत्त्वाकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले आहे. विशेषत: आर्टिक सेक्युरिटी आणि जागतिक महाशक्तींच्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हे महत्त्वाचे विधान ठरणार आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडला ताब्यात घेण्याची आपला मानस यापूर्वी अनेकदा बोलून दाखवला आहे. ग्रीनलँड हा अजस्र भूभाग वेळ पडल्यास डेन्मार्ककडून हिसकावून घेऊ अशी धमकी मध्यंतरी अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. यामुळे डेन्मार्क आणि अमेरिका यांच्यात तणाव देखील वाढला होता.
