Donald Trump On Iran-US War Update : अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासह शेकडो जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अद्यापही हे युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. अमेरिका-इस्रायल आणि इराण हे एकमेकांवर जोरदार प्रतिहल्ले करत असल्याचं दिसत आहे. या युद्धामुळे मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.

असं असतानाच आता अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील या संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प इराणबाबत आणखी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. इराणचा युरेनियम साठा जप्त करण्यासाठी अमेरिका आणि इस्रायल या युद्धात विशेष सैन्य उतरवण्याची शक्यता आहे. या मोहिमेत अमेरिका इराणमध्ये जमिनीवर कारवाई करण्याची शक्यता असून यासाठी गुप्त तयारी सुरू करण्यात आल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे.

अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध सुरू केलेलं युद्ध आतापर्यंत क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लढलं गेलं आहे. मात्र, आता जमिनीवर कारवाई करण्याची चर्चा वॉशिंग्टनमध्ये सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विशिष्ट मोहिमांसाठी इराणमध्ये आणखी अमेरिकन सैन्य तैनात करण्याचे संकेत दिल्याचे वृत्त एनबीसी न्यूजच्या हवाल्याने इंडिया टुडेनी आहे.

अहवालानुसार, अमेरिका आता इराणवर मोठ्या प्रमाणात हल्ला करण्याऐवजी मर्यादित पण टार्गेटवर लक्ष केंद्रित करण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये सैन्याला परिभाषित धोरणात्मक कार्यांसाठी नियुक्त केलं जाऊ शकतं. तसेच आणखी एका अहवालानुसार, अमेरिका आणि इस्रायलने युद्धाच्या नंतरच्या टप्प्यावर अत्यंत समृद्ध युरेनियमच्या साठ्याच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये विशेष सैन्य पाठवण्याच्या शक्यतेवर चर्चा केली आहे.

मर्यादित जमिनीवरील सैन्याचा पर्याय चर्चेत

अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये एक प्रमुख मुद्दा चर्चेत असून इराणकडे अत्यंत समृद्ध युरेनियमचा साठा आहे. अंदाजे ४५० किलोग्रॅम समृद्ध केलेलं हे युरेनियम जर आणखी समृद्ध केलं गेलं तर काही आठवड्यांत शस्त्रास्त्र-ग्रेड युरेनियममध्ये रूपांतरित केलं जाऊ शकतं. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी काँग्रेसच्या ब्रीफिंग दरम्यान याबाबत जमिनीवर कारवाईची शक्यता व्यक्त केली.

ट्रम्प म्हणतात की पर्याय खुले राहतील

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी जमिनीवरील सैन्याचा वापर नाकारण्याचं टाळलं आहे. मात्र, त्यांनी असंही सुचवलं आहे की मोठी तैनाती अशक्य आहे. त्यांनी सांगितलं की, जमिनीवरील सैन्याचा वापर फक्त खूप चांगल्या कारणासाठी केला जाईल. जर आपण असं कधी केलं तर (इराणी) इतके नष्ट होतील की ते जमिनीवर लढू शकणार नाहीत, असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे.