Donald Trump On US Israel Iran War : अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्ध अद्यापही सुरूच आहे. अमेरिका-इस्रायल संयुक्तपणे इराणवर हल्ले करत आहेत, तर इराणही प्रतिहल्ले करत असल्यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या युद्धाचा अनेक देशांना मोठ्या प्रमाणात फटका बसत असून जगातील अनेक देशांना होणारा तेल आणि वायूचा पुरवठा विस्कळीत झाला आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती असल्यामुळे तेलाच्या जहाजांच्या वाहतुकीला अडथळे येत असल्याने कच्च्या तेलाचा व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. व्यापारी जहाजांवर हल्ले होत असल्याने होर्मुझ सामुद्रधुनीत तणावाची परिस्थिती आहे. असं असतानाच आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मोठं वक्तव्य करत इराणला इशारा दिला आहे. पुढील आठवड्यात इराणवर आणखी जोरदार हल्ला करण्याची योजना असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

अमेरिका-इस्रायल आणि इराणमधील युद्धाबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी आज पुन्हा एकदा मोठा इशारा दिला. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, गरज पडल्यास अमेरिका होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजे सुरक्षितपणे बाहेर काढेल. तसेच अमेरिकेच्या नेतृत्वाखालील हे युद्ध यशस्वी होईल. तसेच पुढील आठवड्यात इराणवर आणखी मोठा हल्ला करण्याची योजना आहे, असं भाष्य डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी फॉक्स न्यूजच्या मुलाखतीत बोलताना केलं.

“इराण शरणागती पत्करण्याच्या तयारीत”, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांची ११ मार्च रोजी जी ७ नेत्यांबरोबर व्हर्च्युअल बैठक झाली. या बैठकीत त्यांनी इराण युद्धाबाबत मोठा दावा केला. इराण शरणागती पत्करण्याच्या तयारीत आहे, असं त्यांनी म्हटलं. AXIOS ने यासंदर्भतील वृत्त दिलं. इराण शरणागती पत्कारण्याच्या तयारीत असल्याचा दावा करताना त्यांनी असंही सुचवलं की तेहरानमध्ये असा कोणताही अधिकारी जिवंत राहिलेला नाही ज्याच्याकडे निर्णय घेण्याची शक्ती असेल. “नेता कोण आहे हे कोणालाही माहिती नाही, त्यामुळे कोणीही आत्मसमर्पणाची घोषणा करू शकत नाही”, असं ट्रम्प म्हणाले आहेत.

नेतान्याहू यांचा मोजतबा खामेनींना थेट इशारा!

अमेरिका-इस्रायल यांची इराणविरोधातील लष्करी कारवाई अजूनही सुरूच असून यामुळे मध्यपूर्वेत संघर्ष पेटला आहे. यादरम्यान इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी इराणचे नवे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांना इशारा दिला. खामेनी यांच्यासाठी कुठलाही ‘लाईफ इन्शुरन्स’ नाही, असे नेतान्याहू म्हणाले आहेत. अमेरिका-इस्रायल यांची इराणविरोधातील लष्करी कारवाई ही चांगल्या प्रकारे प्रगती करत आहे, असे नेतान्याहू गुरूवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले.

इस्रायल मोजतबा खामेनी किंवा हिजबुल्लाचे नेते नईम कासिम यांना लक्ष्य करणार का, असे विचारले असता, नेतन्याहू यांनी ही शक्यता नाकारता येणार नाही असे उत्तर दिले. “दहशतवादी संघटनांच्या कोणत्याही नेत्याच्या आयुष्याबाबत (Life Insurance Policy) मी कोणतीही शाश्वती किंवा हमी देणार नाही.” असे नेतान्याहू म्हणाले. “आम्ही काय योजना आखत आहोत किंवा आम्ही काय करणार आहोत, याबद्दलचा नेमका रिपोर्ट येथे देण्याचा माझा कोणताही विचार नाही,” असेही पुढे बोलताना नेतान्याहू म्हणाले.