Donald Trump On Vladimir Putin Residence Drone Attack: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. आता रशिया पुन्हा युक्रेनला जोरदार प्रत्युत्तर देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा रशिया आणि युक्रेन यु्द्ध भडकण्याची चिन्ह आहेत.

व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याच्या रशियाच्या दाव्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. ट्रम्प यांनी म्हटलं की, व्लादिमीर पुतिन यांनी त्यांना सांगितलं की युक्रेनियन ड्रोनने त्यांच्या एका निवासस्थानाला लक्ष्य केलं होतं. मात्र, पुतिन यांचा हा दावा युक्रेनने फेटाळून लावला असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

फ्लोरिडा येथे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी झालेल्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना ट्रम्प यांनी पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने हल्ला केल्याच्या विषयावर भाष्य केलं. ट्रम्प म्हणाले की, “तुम्हाला माहिती आहे का? मला याबद्दल कोणी सांगितलं? पुतिन यांनी सकाळीच मला सांगितलं की यांच्या निवासस्थानावर हल्ला झाला. पण हे चांगलं नाही. मला खूप राग आला आहे”, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला, रशियाचा दावा

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आरोप केला की व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केला आहे. २८ आणि २९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा युक्रेनने मॉस्कोच्या नोव्हगोरोड प्रदेशातील पुतिन यांच्या निवासस्थानावर लांब पल्ल्याच्या ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ९१ ड्रोन होते. मात्र, हे सर्व रशियन हवाई संरक्षण दलांनी रोखलं आहे.

युक्रेनने रशियाचा दावा फेटाळला

व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर युक्रेनने ड्रोन हल्ला केल्याचा रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी केलेला दावा युक्रेनने फेटाळून लावला आहे. ‘रशियाचा आणखी एक खोटेपणा’, असं युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं आहे.