Donald Trump On US air strikes against ISIS in Nigeria : अमेरिकेच्या लष्कराने गुरूवारी रात्री वायव्य नायजेरीयामध्ये दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या तळांना लक्ष्य केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी ऑक्टोबर महिन्यातच नायजेरियामधील दहशतवाद्यांवर ख्रिश्चनांची हत्या केल्याचा आरोप केला होता. तेव्हापासून ते हल्ला करण्याच्या इशार देत होते. नायजेरियामधील सरकार हिंसा रोखण्यात अपयशी ठरले असून, असेच सुरू राहिले आणि अमेरिकेने त्यांचे रक्षण केले नाही तर हा नायजेरियामधील ख्रिश्चनांच्या अस्तित्वाला धोका ठरू शकते असेही ट्रम्प म्हणाले होते.

सोशल मिडिया प्लॅटफॉर्म ट्रुथ सोशलवर या हल्ल्याबद्दल माहिती देताना ट्रम्प यांनी सांगितले की, ‘डिपार्टमेंट ऑफ वॉर’कडून करण्यात आलेली ही करावाई ज्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली अशा ख्रिश्चन बांधवांसाठी होती.

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?

ट्रम्प यांनी लिहिले की,”आज रात्री, कमांडर इन चीफ म्हणून माझ्या आदेशानुसार, अमेरिकेने वायव्य नायजेरियातील ISISच्या दहशतवाद्यांवर एक शक्तिशाली आणि प्राणघातक हल्ला केला आहे. हे दहशतवादी अनेक वर्ष आणि शतकांपासून कधीही न पाहिलेल्या स्तरावर प्रामुख्याने निष्पाप ख्रिश्चनांना लक्ष्य करत होते आणि त्यांची कूररपणे हत्या करत होते! मी यापूर्वीच या दहशतवाद्यांना इशारा दिला होता की, जर त्यांनी ख्रिश्चनांचे हत्याकांड थांबवले नाही, तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल आणि आज रात्री तेच झाले.”

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, “डिपार्टमेंट ऑफ वॉरने अत्यंत अचूक हल्ले केले, जे फक्त अमेरिकाच करू शकते. माझ्या नेतृत्वाखाली, आपला देश कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाला कधीही वाढू देणार नाही. ईश्वर आपल्या लष्कराला आशीर्वाद देवो आणि सर्वांना आणि मृत दहशदवाद्यांनाही मेरी ख्रिसमस.”

जर ख्रिश्चनांच्या हत्या अशाच सुरू राहिल्या तर मृत दहशतवाद्यांच्या संख्येत अशाच प्रकारे भर पडत राहिल असा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी दिला आहे.

अमेरिकन सैन्याच्या आफ्रिका कमांडने एक्सवर वर या कारवाईची अधिकृत माहिती देताना सांगितले की, नायजेरियन प्रशासनाच्या विनंतीवरून हा हवाई हल्ला करण्यात आला आणि या कारवाईत आयएसआयएसचे अनेक दहशतवादी मारले गेले आहेत.

नायजेरियन सरकारणे म्हटले आहे की, शसस्त्र गट हे मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन्हींना लक्ष्य करत आहेत, आणि ट्रम्प यांचा ख्रिश्चनांना छळाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा हा गुंतागुंतीची सुरक्षेसंबंधी परिस्थिती न दाखवणार आणि धार्मिक स्वतंत्र्याचे रक्षण करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणारा आहे. असे असले तरी दहशतवादी गटांविरुद्ध आपल्या सैन्याला अधिक सक्षम करण्यासाठी नायजेरियाने अमेरिकेबरोबर मिळून काम करण्याची तयारी दर्शवली आहे, असे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.