मध्यपूर्वेतील संघर्ष आता टोकाला पोहोचला असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला मोठा लष्करी तडाखा दिला आहे. इराणच्या अर्थव्यवस्थेचा कणा आणि तेल निर्यातीचे प्रमुख केंद्र असलेल्या खर्ग बेटावर (Kharg Island) अमेरिकेने शक्तिशाली बॉम्बफेक केली आहे.
अमेरिकन लष्कराने इराणच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या खर्ग बेटावर शक्तीशाली बॉम्ब हल्ला केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. या बेटावरील सर्व लष्करी लक्ष्य उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला असून यानंतर इराणच्या महत्त्वाच्या तेलासंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले जाऊ शकते असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी अमेरिकन लष्कर आज इराणवर सर्वात शक्तीशाली हल्ले केले जातील, असे विधान केल्याच्या काही तासांनी हा हल्ला करण्यात आला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ सोशलवर पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. ट्रम्प यांनी सांगितले की, हा हल्ला या भागात करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली लष्करी कारवायांपैकी एक होता.
“काही क्षणांपूर्वी, माझ्या आदेशानुसार, युनायटेड स्टेट्स सेंट्रल कमांडने मध्य पूर्वेच्या इतिहासातील सर्वात शक्तिशाली बॉम्बहल्ल्यांपैकी एक हल्ला केला असून, इराणचे ‘क्राउन ज्युल’ मानल्या जाणाऱ्या खर्ग बेटावरील सर्व लष्करी लक्ष्य पूर्णपणे नष्ट केले,” असे ट्रम्प यांनी सांगितले.
खर्ग बेट हे इराणच्या तेल निर्यातीचे प्रमुख केंद्र आणि आखातामधील धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांनी जाणीवपूर्वक बेटावरील तेलासंबंधी पायाभूत सुविधांना लक्ष्य केले नाही, पण त्यांनी इशारा दिला की जर प्रदेशातील तेलाचा प्रवाह रोखण्यात आला तर पुढे ते देखील केले जाऊ शकते.
“सभ्यतेच्या कारणास्तव, मी या बेटावरील तेलासंबंधी पायाभूत सुविधा पूर्णपणे नष्ट न करण्याचा निर्णय घेतला आहे , मात्र, जर इराण किंवा इतर कोणी, होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांच्या मुक्त आणि सुरक्षित पॅसेजमध्ये हस्तक्षेप करण्यासाठी काहीही केले तर मी तात्काळ या निर्णयाचा फेरविचार करेन,” असे ट्रम्प त्यांच्या पोस्टमध्ये म्हणाले.
होर्मुझची सामुद्रधुनी हा उर्जा सुरक्षेसाठी जगातील सर्वात महत्त्वाचा जलमार्ग आहे. या अरुंद जलमार्गातून दररोज जागतिक तेल वाहतुकीचा अंदाजे पाचवा हिस्सा जातो. त्यामुळे यामध्ये कुठलाही अडथळा आला तर त्याचा जगभरात परिणाम पाहायला मिळतो.
ट्रम्प यांनी यांच्या पोस्टमधून अमेरिकन लष्कराची शक्ती अधोरेखित केली आहे, तसेच इराणला इराणला संघर्ष वाढवू नये याबाबत इशारा देखील दिला आहे.
“आमची शस्त्रे जगाने आतापर्यंत पाहिलेली सर्वात शक्तिशाली आणि अत्याधुनिक शस्त्रे आहेत,” असे ट्रम्प म्हणाले. “आम्हाला ज्या कशार हल्ला करायचा आहे, त्याचे रक्षण करण्याची कसलीच क्षमता इराणकडे नाही,” असेही ट्रम्प म्हणाले.
इराणला कधीही अण्वस्त्र मिळू नयेत या अमेरिकेच्या भूमिकेचाही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला. ट्रम्प म्हणाले की, “इराणकडे कधीच अण्वस्त्र येणार नाहीत, तसेच त्यांच्याकडे अमेरिका, मध्य पूर्व किंवा, जगाला धमकावण्याची क्षमताही असणार नाही.”
ट्रम्प यांनी इराणच्या लष्कराला देखील यावेळी कठोर इशारा दिला तसेच संघर्ष सोडून देण्याचे आवाहन केले. “इराणचे लष्कर, आणि या दहशतवादी राजवटीबरोबर सामील असलेल्या इतरांनी आपले शस्त्रे खाली ठेवून, आपल्या देशात जे काही उरले आहे ते वाचवणे शहाणपणाचे ठरेल, जे फार काही शिल्लक नाही.”
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेला मध्यपूर्वेतील संघर्ष चांगलाच पेटला आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेने इराणसाठी महत्त्वाचे असलेल्या बेटावर हल्ला केला आहे.
