Donald Trump orders US Navy to use lethal force in Strait of Hormuz conflict : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन नौदलाला महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये सुरुंग पेरत असल्याचा संशय असणाऱ्या बोटीविरोधात प्राणघातक बळाचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढत असताना ट्रम्प यांनी हे निर्देश दिले आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर केलेल्या आपल्या एक पोस्टमध्ये म्हटले आहे की, ” मी अमेरिकेच्या नौदलाला आदेश दिले आहेत की, होर्मुझच्या सामुद्रधुनीत सुरुंग पेरत असलेल्या कोणत्याही बोटीला, लहान बोटींना हल्ला करून त्या नष्ट करण्याचे (शूट अँड किल) आदेश दिले आहेत. (त्यांच्या नौदलाची सर्व १५९ जहाजे समुद्राच्या तळाला गेली आहेत!) यामध्ये कोणताही संकोच बाळगला जाणार नाही.”

ट्रम्प पुढे म्हणाले की, सामुद्रधुनीत सुरुंग साफ करण्याची मोहिम ही आधीच सुरू करण्यात आली आहे आणि ती अधिक तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. “याबरोबर, आमचे माइन स्वीपर्स या घडीला सामुद्रधुनी साफ करत आहेत. मी हे काम सुरू ठेवण्याचे, पण आता तिप्पट वेगाने करण्याचे आदेश देत आहे!”

सुरुंगांचा धोका आणि अमेरिका-इराण या दोन देशांची नौदले समोरासमोर आल्याने जागतिक व्यापारासाठी महत्त्वाचा सागरी मार्ग अनेक दिवस बंद राहण्याची भीती वाढली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांचे हे विधान समोर आले आहे.

इराणने आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. जोपर्यंत अमेरिका युद्धविरामाचे उल्लंघन करत राहिल तोपर्यंत सामुद्रधुनी पूर्णपणे खुली होणार नाही, असे इराणने स्पष्ट केले आहे. दरम्यान होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्याने जागतिक बाजारपेठेला मोठा झटका बसला असून तेल आणि गॅसच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत.