Jaime Leigh Franklin Electric Shock Claim: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत लसीकरणासंदर्भातील एका आदेशावर स्वाक्षरी करताना उभ्या असलेल्या एका महिलेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. एक्स आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर या महिलेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. ट्रम्प यांना जागे करण्यासाठी तिने त्यांना शॉक दिल्याचा दावा केला जात आहेत. यावर आता स्वत: या महिलेने स्पष्टीकरण दिले आहे.

दावा काय?

जेमी लीघ फ्रँकलिन असे या महिलेचे नाव आहे. त्या ‘द कन्झर्व्हेटूर’ या मीडिया आणि लाइफस्टाईल ब्रँडच्या संस्थापक आणि सीईओ असल्याची माहिती समोर आली आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये फ्रँकलिन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आणि आरोग्य सेवा सचिव रॉबर्ट एफ. केनेडी ज्युनियर यांच्यामध्ये ओव्हल ऑफिसमध्ये उभी असल्याचे दिसते. फ्रँकलिन वारंवार मान डोलावून आपल्या पोटावर हात ठेवल्याचे दिसत फ्रँकलिन आहे. राष्ट्राध्यक्षांना जागे ठेवण्यासाठी तिने ट्रम्प यांना इलेक्ट्रिक शॉक दिल्याचा दावा केला जात आहे.

फ्रँकलिन यांनी काय स्पष्टीकरण दिले?

पत्रकार परिषदेवेळी ट्रम्प यांना जागे करण्यासाठी पोटावर हात ठेवून बटण दाबल्याचा दावा केल्यानंतर आता फ्रँकलिन यांनी स्वत: याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. असाच दावा करणारी एक पोस्ट एक्सवर व्हायरल होत आहे. या पोस्टला कोट करून आपण गर्भवती असल्याचा खुलासा जेमी लीघ फ्रँकलिन यांनी केला आहे. लशींच्या शिफारशी सुधारित करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी करत असताना हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता.

फ्रँकलिन यांनी एक्सवर पोस्ट करून ओव्हल ऑफिसमध्ये राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासमवेत पत्रकार परिषदेत सहभागी होण्याचा मान मिळाल्याचे म्हटले होते.

कोण आहेत जेमी लीघ फ्रँकलिन?

‘न्यूजवीक’च्या वृत्तानुसार, फ्रँकलिन उत्तर कॅरोलिना येथील ट्रम्प प्रशासनातील माजी कर्मचारी आहेत. त्यांनी २०२० मध्ये कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कले येथून पदवी प्राप्त केली आहे. त्या २०१९ मध्ये युनायटेड स्टेट्स सेनेटमध्ये कायदेशीर इंटर्न होत्या. त्यांनी २०२० च्या ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या मोहिमेसाठी युती समन्वयक म्हणून काम केले. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये डायलरेक्टर ऑफ करस्पॉन्डन्स म्हणून जबाबदारीही सांभाळली होती.