Trump and Takaichi: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जपानच्या पंतप्रधान सानाए ताकायची यांच्यात झालेली भेट सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. दोन्ही राष्ट्र प्रमुखांमधील ही भेट एक नेहमीची राजनैतिक भेट ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती एका विचित्र संवादात रूपांतरित झाली आणि सभागृहात स्पष्ट तणाव निर्माण झाल्याचे दिसत होते. इराणवर अलीकडेच केलेल्या हल्ल्यांपूर्वी अमेरिकेने जपानसह आपल्या मित्र राष्ट्रांना माहिती का दिली नाही, असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला आणि याच क्षणापासून अस्वस्थतेला सुरुवात झाली. ओव्हल ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत एका जपानी पत्रकाराने हा प्रश्न उपस्थित केला.

पर्ल हार्बरबद्दल माहिती का नाही दिली?

ट्रम्प यांनी उत्तर देताना सांगितले की, हल्ल्यांचा आश्चर्याचा धक्का कायम ठेवण्यासाठी ही माहिती गुप्त ठेवण्यात आली होती. मात्र, त्यानंतर विनोद करण्याच्या प्रयत्नात त्यांनी अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत वेदनादायक घटनेचा संदर्भ दिला. “आम्ही कोणालाही सांगितले नाही, कारण आम्हाला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता. आश्चर्याबद्दल जपानपेक्षा चांगले कोणाला माहीत आहे? तुम्ही मला पर्ल हार्बरबद्दल का सांगितले नाही?” असे ट्रम्प म्हणाले. हा उल्लेख पर्ल हार्बरवरील हल्ल्याचा होता, ज्यामध्ये जपानी सैन्याने अचानक हल्ला करून २,००० हून अधिक अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता.

‘जगभरात शांतता प्रस्थापित करू शकणारी व्यक्ती’

या वक्तव्यावर सानाए ताकायची यांनी कोणतीही शब्दांत प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, त्यांची देहबोलीच बरेच काही सांगून गेली. त्यांनी डोळे मोठे केले, खुर्चीत मागे टेकल्या आणि त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य क्षणात नाहीसे झाले. हा क्षण सोशल मीडियावरही झपाट्याने व्हायरल झाला. ताकायची यांनी या टिप्पणीवर थेट प्रतिक्रिया देणे टाळले आणि ट्रम्प यांच्याशी नम्रपणे संवाद सुरू ठेवला. एका क्षणी त्यांनी ट्रम्प यांचे कौतुक करत त्यांना ‘जगभरात शांतता प्रस्थापित करू शकणारी व्यक्ती’ असेही म्हटले. तरीही, त्यांच्या हालचालींमधून अस्वस्थता जाणवत होती. ट्रम्प प्रश्नांची उत्तरे देत असताना त्या अधूनमधून घड्याळाकडे पाहताना दिसल्या.

ट्रम्प यांची यापूर्वीची विधाने

जागतिक नेत्यांना अस्वस्थ करणारी विधाने करण्याची ट्रम्प यांची ही पहिलीच वेळ नाही. काही दिवसांपूर्वी आयर्लंडच्या नेत्यांच्या भेटीत त्यांनी विन्स्टन चर्चिल यांचे कौतुक केले होते. तसेच, जर्मनीचे नेते फ्रेडरिक मेर्झ यांच्यासोबतच्या बैठकीत त्यांनी ‘डी-डे’चा उल्लेख करत, “तो तुमच्यासाठी चांगला दिवस नव्हता,” असे म्हटले होते. त्यावर मेर्झ यांनी सावधपणे उत्तर देत, “दीर्घकाळात तो आमच्या देशाची नाझी हुकूमशाहीतून मुक्ती होती,” असे स्पष्ट केले.

दरम्यान, हा संपूर्ण प्रकार वाढत्या जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर घडला. इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे अमेरिका या संघर्षात अधिक खोलवर ओढली गेली असून, ट्रम्प आता जपानसह मित्र राष्ट्रांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. “आम्ही ही मोहीम राबवत आहोत आणि ती पूर्ण झाल्यावर जग अधिक सुरक्षित होईल,” असे ट्रम्प यांनी सांगितले.