वृत्तसंस्था, वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढील दोन दिवसांत पाकिस्तानात इराणबरोबर चर्चा सुरू होऊ शकते, असे ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत सूचित केले आहे. ते म्हणाले, “तुम्ही लक्ष ठेवा. कारण पुढील दोन दिवसांत काहीतरी मोठे घडू शकते आणि आम्हाला खरोखर तिथे जाण्याची इच्छा आहे.” पाकिस्तानचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असिम मुनीर उत्कृष्ट काम करत आहेत, त्यामुळे हे शक्य झाले असल्याची प्रशंसाही ट्रम्प यांनी केली. ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे पहिल्या फेरीप्रमाणेच दुसऱ्या फेरीसाठीही शुक्रवार ते रविवार या दरम्यानची वेळ निवडली जाऊ शकते.
ट्रम्प-मोदी चर्चा
डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात मंगळवारी संध्याकाळी दूरध्वनीवरून संभाषण झाले. यावेळी दोन्ही नेत्यांनी पश्चिम आशियातील घडामोडींविषयी चर्चा केली. ही चर्चा ४० मिनिटे चालल्याचे सांगण्यात आले. या संभाषणानंतर अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्गेई गोर यांनी पत्रकारांना सांगितले की, होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यावर दोन्ही नेत्यांदरम्यान एकमत झाले. पंतप्रधान मोदी यांनी समाजमाध्यमावर पोस्ट लिहून ट्रम्प यांनी आपल्याला फोन केल्याचे सांगितले.
