India-US Trade Deal 18% Tariff: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ‘माय फ्रेंड डोनाल्ड ट्रम्प’ असं म्हणत सोशल मीडियावरून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमनं उधळली आहेत. जागतिक शांततेसाठी डोनाल्ड ट्रम्प यांचं नेतृत्व फार महत्त्वाचं असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं. पण ज्या भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सोमवारी रात्रीपासून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे, त्या करारातील तरतुदींबाबत या दोघांमध्ये नेमकं काय ठरलंय? याबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. कारण ज्या बाबी डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या घोषणेत ठळकपणे नमूद केल्या, त्या बाबींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोशल पोस्टमध्ये उल्लेखदेखील नसल्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.
भारत व अमेरिका यांच्यात गेल्या अनेक महिन्यांपासून व्यापार करारासंदर्भात चर्चेच्या फेऱ्या झडत होत्या. या फेऱ्यांमधून फारसं काही हाती लागत नव्हतं. अखेर सोमवारी रात्री डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केल्यानंतर दोन्ही देशांमधील व्यापार कराराला अंतिम स्वरूप देण्यात आलं. या कराराची घोषणादेखील डोनाल्ड ट्रम्प यांनीच परस्पर केली. त्यानंतर पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये यासंदर्भात माहिती देताना डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. पण दोन्ही पोस्टमध्ये काही अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यांबाबत विरोधाभास दिसून येत आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टमध्ये काय?
डोनाल्ड ट्रम्प यांनी TRUTH या सोशल साईटवर केलेल्या पोस्टमध्ये भारत व अमेरिकेदरम्यान व्यापार करार झाल्याची घोषणा केली. भारतानं रशियाकडून कच्च्या तेलाची आयात पूर्णपणे बंद करण्याचं मान्य केल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. शिवाय, अमेरिकेवर लागू करण्यात येणारं टॅरिफ टप्प्याटप्प्याने शून्यावर आणण्याच्या दिशेनं भारत काम करेल, असंही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
वाचा डोनाल्ड ट्रम्प यांची संपूर्ण पोस्ट…
आज सकाळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधून आनंद झाला. मोदी हे माझे एक महान मित्र असून त्यांच्या देशाचे शक्तिशाली व आदरणीय नेते आहेत. आम्ही अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यात व्यापारविषयक बाबी व रशिया आणि युक्रेनमधील युद्धसमाप्तीसाठी प्रयत्न करण्याचाही समावेश होता. रशियाकडून तेल खरेदी बंद करण्यास त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्याऐवजी बऱ्याच प्रमाणात अमेरिका व बहुधा व्हेनेझुएलाकडून ते तेल खरेदी करतील. यामुळे युक्रेनमधील युद्ध संपण्यास मदत होईल. या युद्धामुळे सध्या युक्रेनमध्ये रोज शेकडोंच्या संख्येनं नागरिक मारले जात आहेत. आमच्यातली मैत्री व मोदींबाबतचा आदर लक्षात घेता त्यांच्या विनंतीवरून आम्ही भारत व अमेरिकेतील व्यापार करार अंतिम केला आहे. यानुसार अमेरिकेकडून भारतावर २५ टक्क्यांऐवजी आता १८ टक्के टॅरिफ आकारलं जाईल. त्याचवेळी भारताकडून अमेरिकेवर आकारल्या जाणाऱ्या टॅरिफचं प्रमाण टप्प्याटप्प्याने शून्यापर्यंत नेण्यासाठी ते प्रयत्न करतील. अमेरिकेत उत्पादित होणाऱ्या ऊर्जा, तंत्रज्ञान, कृषी, कोळसा व इतर अनेक उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांची बांधिलकी दर्शवली आहे. यापुढील काळात आमची भारताशी असणारी मैत्री अधिकाधिक वृद्धिंगत होईल. पंतप्रधान मोदी व मी अशी दोन माणसं आहोत जी गोष्टी करून घेतो. यातल्या अनेक बाबी सांगता येणार नाहीत. धन्यवाद.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टमध्ये काय?
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमध्ये रशियाकडून तेलखरेदी पूर्णपणे बंद आणि अमेरिकेवरील टॅरिफ शून्यावर आणण्याचा मुद्दा ठळकपणे मांडलेला असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टमध्ये या मुद्द्यांचा उल्लेखदेखील नाही. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जे मुद्दे या व्यापार करारात सर्वात महत्त्वाचे मानले जात होते आणि भारताचं महत्त्व त्यानुसार जोखलं जात होतं, त्या मुद्द्यांचा ट्रम्प यांनी पोस्टमध्ये समावेश केला असला, तरी मोदींच्या पोस्टमध्ये मात्र या मुद्द्यांचा समावेश नाही.
वाचा नरेंद्र मोदींची संपूर्ण पोस्ट…
माझे मित्र राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी आज संवाद साधून आनंद झाला. आता भारतीय उत्पादनांवरचं टॅरिफ १८ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. १४० कोटी भारतीयांकडून डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या या घोषणेसाठी खूप खूप धन्यवाद. जेव्हा जगातल्या दोन मोठ्या अर्थव्यवस्था आणि सर्वात मोठ्या लोकशाही व्यवस्था एकत्र काम करतात, तेव्हा त्यातून आपल्या जनतेचा मोठा फायदा होतो. यातून दोन्ही देशांच्या फायद्यासाठीच्या परस्पर सहकार्यासाठी असंख्य संधी खुल्या होतील. जागतिक शांतता, स्थैर्य व समृद्धीसाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नेतृत्व अत्यंत महत्त्वाचं आहे. शांततेसाठीच्या त्यांच्या प्रयत्नांना भारत पूर्णपणे पाठिंबा देत आहे. भारत व अमेरिका यांच्यातील या भागीदारीला न भूतो, न भविष्यती अशा उंचीवर नेण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.
भारत व अमेरिका यांच्यातील या व्यापार करारामुळे भारतातील उद्योग जगतामध्ये काहीसं सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचं दिसत असलं, तरी करारात नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आला आहे? कोणत्या बाबी आपण मान्य केल्या आहेत? कोणत्या बाबी अमेरिकेनं मान्य केल्या आहेत? या बाबींचा खुलासा होणं महत्त्वाचं ठरणार आहे.

