पंतप्रधान मोदी हे जी-७ शिखर परिषदेसाठी फ्रान्सच्या दौऱ्यावर आहेत. आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी त्यांची द्वीपक्षीय बैठक होणार असून या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. ट्रम्प म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे शांत, संयमी आणि जबरदस्त व्यक्ती आहेत.” काही काळापासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंधामधील तणाव कायम असूनही दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक सलोखा अजूनही असल्याचे यावरून दिसते.

मंगळवारी (१६ जून) जवळपास १६ महिन्यानंतर पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प समोरासमोर आले होते. टॅरिफचा वाद, रखडलेला व्यापार करार आणि ओमानच्या आखातामध्ये तीन भारतीय खलाशांचा झालेला मृत्यू यामुळे भारत-अमेरिका संबंधात काहीसा तणाव निर्माण झाला होता. यानंतरही मंगळवारी पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांनी स्मितहास्य करत हस्तांदोलन केले.

बुधवारी (दि. १७) राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. जागतिक नेत्यांसमोर बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “मोदी शांत, संयमी आणि जबरदस्त कामगिरी करणारे व्यक्ती आहेत. मी मोदींसारखा नाही. त्यांच्याकडे बघा जरा”

पंतप्रधान मोदींना ‘किलर’ व्यक्तिमत्व म्हणण्याची ट्रम्प यांची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी पंतप्रधान मोदींच्या वाटाघाटी करण्याच्या क्षमतेकडे लक्ष वेधत हा शब्दप्रयोग केला होता. ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींसाठी हा शब्दप्रयोग पहिल्यांदा २०२४ मध्ये अध्यक्षीय निवडणुकीपूर्वी केला होता.

एका पॉडकास्टमध्ये बोलत असताना ट्रम्प म्हणाले होते, “मोदी माझे मित्र असून ते एक चांगले व्यक्तीही आहेत. बाहेरून पाहिल्यास ते तुम्हाला वडिलांसारखे भासतात. ते एक जबरदस्त आणि ‘टोटल किलर’ व्यक्ती आहेत.”

ट्रम्प आणि मोदी यांची भेट महत्त्वाची का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणारी बैठक अतिशय महत्त्वाची असल्याचे मानले जाते. याची प्रमुख दोन कारणे सांगितली जातात. दोन्ही देशांमध्ये प्रलंबित असलेला व्यापार करार आणि अमेरिकेने ओमानच्या आखातामध्ये जहाजावर केलेल्या हल्ल्यामुळे तीन खलाशांचा मृत्यू झाल्यानंतर भारताला खलाशांच्या सुरक्षेबाबत वाटणारी चिंता याबद्दल या बैठकीत चर्चा होऊ शकते.

मंगळवारी झालेल्या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी जहाजांवरील हल्ल्यांचा मुद्दा उपस्थित करून खलाशांच्या संरक्षणासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले होते.