अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय निवडणूक आयोगाचं आणि भारतीय निवडणूक पद्धतीचं कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी द ट्रूथवर एक पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी भारतीय निवडणूक आयोगाचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी असं म्हटलं आहे की भारतात निवडणूक ओळखपत्रावर मतदाराचा फोटो असतो. त्याची ओळख पटवण्यासाठी योग्य ती खबरदारी घेतलेली असते. ही बाब कौतुकास्पद आहे. भारताकडून अमेरिकेने शिकण्याची गरज आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची पोस्ट काय?

या महिन्याच्या सुरुवातीला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आमच्या म्हणजेच अमेरिकेच्या प्रशासनाला विचारलं होतं की की अमेरिकेत तुम्ही मतदारांना फोटो असलेली ओळखपत्रं का दिलेली नाहीत? त्याशिवाय तुम्ही निवडणुका कशा काय घेता? भारतात २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत ६४ कोटी ६० लाख लोकांहून अधिक मतदारांनी मतदान केलं. प्रत्येक मतदाराकडे त्यांच निवडणूक ओळखपत्र होतं कारण ते असणं अनिवार्य आहे. आता या पार्श्वभूमीवर अमेरिकाही पावलं उचलणार आहे आम्ही लवकरच या संबंधातला कायदा मंजूर करु असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. एवढंच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या पोस्टमधून सेव्ह अमेरिका अॅक्ट पास करण्याचीही घोषणा केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये यावर जोर दिला आहे की ते सेव्ह अमेरिका अॅक्ट आणतील. हा कायदा आणणं आवश्यक आहे. ज्याद्वारे अमेरिकेतील नागरिकांसाठी मतदार नोंदणी करताना नागरिकतेचा पुरावा दाखवणं हे अनिवार्य असणार आहे. तसंच संपूर्ण देशभरात मतदार ओळखपत्र व्यवस्थाही लागू केली जाणार आहे. तसंच पोस्टल मतदान पद्धतीवर निर्बंध लादले जाणार आहेत असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे.