Donald Trump on Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष वाढला असून दोन्ही देशांकडून याला युद्धाचे स्वरुप दिले जात आहे. पाकिस्तानने काबूल, कंदाहार आणि पक्तिया या ठिकाणी केलेल्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानच्या २७०हून अधिक तालिबानी सैनिकांना मारल्याचा दावा केला, तर अफगाणिस्तानने केलेल्या हल्ल्यात पाकिस्तानच्या ५५ सैनिकांना ठार मारल्याचा दावा केला. दरम्यान जगातील प्रत्येक युद्धात उडी घेणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माध्यमांशी बोलत असताना त्यांनी पाकिस्तानचे उघड समर्थन दिले आहे.
डोनाल्ड ट्रम्प मध्यस्थी करणार का?
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यादरम्यान सुरू असलेल्या संघर्षाबाबत ट्रम्प यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, “मी यात मध्यस्थी करू शकतो. पण तुम्हाला माहिती आहेच की, पाकिस्तानशी माझे चांगले संबंध आहेत. तिथे एक उत्तम पंतप्रधान आहेत. त्यांचे लष्करप्रमुखही चांगले आहेत. मी त्या दोघांचाही आदर करतो. पाकिस्तान चांगले काम करत आहे.” तालिबानच्या हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्याचा अधिकार पाकिस्तानला आहे, असेही ट्रम्प यांनी माध्यमांना सांगितले.
अमेरिकेच्या अंडर सेक्रेटरी ॲलिसन हूकर यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव आमना बलोच यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि त्यांना वॉशिंग्टनचा पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. “पाकिस्तान आणि तालिबानमध्ये उडालेल्या संघर्षातून जी जीवितहानी झाली, त्याबद्दल शोक व्यक्त करण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिव आमना बलोच यांच्याशी फोनवरून संवाद साधला. आम्ही या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत आहोत. तालिबानच्या हल्ल्यांपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानच्या अधिकाराचे आम्ही समर्थन करतो.”
अंडर सेक्रेटरी ॲलिसन हूकर यांच्या निवेदनात तणाव निवळण्यासंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या जाणार आहेत. या दोन देशातील शहरात राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
इतर देशांकडून मध्यस्थीची भूमिका
अमेरिकेने पाकिस्तानला समर्थन दिले असले तरी इतर देशांनी मात्र या संघर्षात मध्यस्थी करण्याची भूमिका व्यक्त केली आहे. युकेने तणाव कमी करण्याचे आवाहन केले होते. तर चीन आणि इराणने युद्धबंदीचे आवाहन करत मध्यस्थी करण्याची तयारी दर्शवली होती.
