Donald Trump praises PM Modi highlighting India US trade deal: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा कौतुक करत त्यांना चांगले मित्र म्हटले आहे. तसेच, भारत आणि अमेरिकेत लवकरच व्यापार करार होईल, असा विश्वास व्यक्त केला. “मला तुमचे पंतप्रधान खूप आवडतात. ते माझे चांगले मित्र आहेत आणि आमचे आपापसात उत्तम जमते. आमचे संबंध खूप चांगले आहेत,” असे ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

भारताने अमेरिकेचा फायदा घेतल्याचा आरोप

भारताने अनेक वर्षांपासून अमेरिकेच्या बाजारपेठेचा पुरेपूर फायदा घेतला पण, अमेरिकन वस्तूंवर प्रचंड कर लादले अशी टीका ट्रम्प यांनी केली. ​”अनेक वर्षे भारताने अमेरिकेचा फायदा घेतला. त्यांनी आमच्यावर प्रचंड आयात शुल्क (टॅरिफ) लादले आणि स्वतः मात्र काहीच दिले नाही,” असा आरोप ट्रम्प यांनी केला. पण, गेल्या काही वर्षांत या व्यापारी संबंधांचे स्वरूप बदलले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. भारताबरोबरच्या आर्थिक संबंधांमधून अमेरिकेला अधिक फायदा होत असल्याचेही ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

हार्ले-डेव्हिडसनचे उदाहरण

डोनाल्ड ट्रम्प यांनी यावेळी अमेरिकेची प्रसिद्ध मोटरसायकल कंपनी ‘हार्ले-डेव्हिडसन’चा उल्लेख केला. “हार्ले-डेव्हिडसनला भारतात येऊ देत नव्हते. त्यांनी त्यावर २०० टक्के टॅरिफ लावले होते. दुर्दैवाने हे माझ्या कार्यकाळापूर्वी घडले होते. त्यांना त्यांच्या मोटारसायकली इथे (अमेरिकेत) विकायच्या होत्या आणि आम्ही त्यांच्याकडून कोणताही कर घेत नव्हतो,” असे ट्रम्प म्हणाले. दरम्यान, यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि अमेरिका व्यापारी कराराबाबत आशावाद व्यक्त केला.

दिल्लीतील बैठक सकारात्मक

अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील आयात कर ५० टक्क्यांवरून १८ टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मान्यता दिली होती. याच पार्श्वभूमीवर, भारत आणि अमेरिकेदरम्यान १ ते ४ जून दरम्यान नवी दिल्ली येथे चार दिवसांची व्यापारी चर्चा पार पडली. ‘युनायटेड स्टेट्स ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह’च्या मुख्य वार्ताहरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भारतीय अधिकाऱ्यांशी वस्तूंचा व्यापार, सीमाशुल्क प्रक्रिया, व्यापार सुलभीकरण, गैर-टॅरिफ अडथळे आणि आर्थिक सुरक्षा सहकार्य यांसारख्या विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली. ​दोन्ही बाजूंनी ही चर्चा फलदायी झाल्याचे सांगितले.

वाटाघाटी अंतिम टप्प्यात – सर्जियो गोर

भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर यांनी वाटाघाटी शेवटच्या टप्प्यात असून कराराचा केवळ छोटासा भाग शिल्लक असल्याचे सांगितले. पण, अलिकडेच समोर आलेल्या माहितीनुसार, ट्रम्प प्रशासन भारत सरकारसह ६० देशांमधून होणाऱ्या आयातीवर अतिरिक्त १२.५ टक्के कर लावण्याचा विचार करत आहे.