अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे कायम कोणत्या न कोणत्या कारणांनी चर्चेत असतात. ट्रम्प यांनी आता पुन्हा एकदा आपल्या पगाराबाबत मोठा दावा करून सर्वांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला आहे. “मी माझा राष्ट्राध्यक्षपदाचा पगार घेत नाही, तरी मला कोणी साधं धन्यवादही म्हणत नाही”, अशा शब्दांत ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर आपण आपल्या पहिल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळातही पगार घेतला नसल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी काय म्हटलं?
ट्रम्प यांनी आपल्याला राष्ट्राध्यक्षपदासाठी मिळणारे वेतन दान करूनही त्याबद्दल कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा दावा करत नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्राध्यक्षपदासाठी मिळणारे वेतन न घेण्याच्या निर्णयाबद्दल आपल्याला कोणतीही विशेष दाद मिळत नाही किंवा कोणीही आपले साधे आभार देखील मानत नाही अशी तक्रार डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे.
“मी माझे राष्ट्राध्यक्षपदासाठी मिळणारे वेतन घेत नाही. पण त्याबद्दल माझे आभार मानले जातात का? तर अजिबात नाही. कोणीही असं म्हणत नाही की खूप खूप धन्यवाद, महोदय”, असं म्हणत ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या संदर्भातील वृत्त टाइम्स नाऊने दिलं आहे.
दरम्यान, २०१७ ते २०२१ या ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी आपला राष्ट्राध्यक्षपदाचा पगार दान करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, व्हाईट हाऊसने नॅशनल पार्क सर्व्हिस, आरोग्य आणि मानवी सेवा विभाग, शिक्षण विभाग, परिवहन विभाग आणि होमलँड सिक्युरिटी विभाग या सारख्या विभागांना काही रक्कम दान केल्याची माहिती सांगितली होती. त्यानंतर आता जानेवारी २०२५ मध्ये ट्रम्प दुसऱ्या कार्यकाळासाठी व्हाईट हाऊसमध्ये परतल्यानंरही त्यांनी आपल्याला मिळणारा पगार दान केला जात असल्याचा दावा केला आहे.
ट्रम्प यांनी ‘एआय’चं नाव बदललं, प्रस्तावावर स्वाक्षरी
डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट ‘एआय’चं नाव बदललं असून नव्या नावाच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याची माहिती समोर आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंबरोबर एक बैठक घेतली. या बैठकीत ट्रम्प यांनी एआय (AI) चं नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीत अनेक उद्योगपती सहभागी झालेले होते.
‘एआय’चं नाव आता ‘एसआय’ (SI) असं करण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्यांच्या सीईओंबरोबर झालेल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. त्या अनुषंगाने ट्रम्प यांनी एका आदेशावर स्वाक्षरी केली असून आता अमेरिकेच्या प्रशासनात ‘एआय’चं नाव अधिकृतपणे बदलून ‘एसआय’ (सुपर इंटेलिजन्स) असं करण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ या शब्दाऐवजी ‘सुपर इंटेलिजन्स’ हा शब्द तंत्रज्ञानाची खरी ताकद आणि क्षमता अधिक प्रभावीपणे दर्शवत असल्याचा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. तसेच ‘एआय’चं नाव बदलण्याच्या आणि नव्या नावाच्या प्रस्तावावर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी देखील केली आहे. त्यामुळे आता ‘एआय’ हे ‘एसआय’ या नावाने ओळखलं जाणार आहे.
