No Kings Rally Against Donld Trump : इराणविरोधात युद्ध पुकारल्याने जगभरातील देशांना याचा त्रास सहन करावा लागतोय. परिणामी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात रोष वाढत गेल्याचं चित्र निर्माण झालंय. तसंच, त्यांच्या विविध धोरणांविरोधात शनिवारी अमेरिका आणि युरोपमध्ये “नो किंग्स” (No Kings) रॅलींच्या माध्यमातून लाखो लोकांनी निदर्शने केली. या आंदोलनाचे मुख्य केंद्र मिनेसोटा होते. सेंट पॉल येथील मिनेसोटा कॅपिटलच्या मैदानावर आणि आसपासच्या रस्त्यांवर हजारो लोक खांद्याला खांदा लावून उभे होते. काहींनी अमेरिकेचे झेंडे उलटे धरले होते, जे ऐतिहासिकदृष्ट्या संकटाचे लक्षण मानले जाते. द हिंदूने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ब्रूस स्प्रिंगस्टीनचे सादरीकरण
या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण प्रसिद्ध गायक ब्रूस स्प्रिंगस्टीन होते. त्यांनी “स्ट्रीट्स ऑफ मिनीपोलिस” हे गाणे सादर केले. फेडरल एजंट्सनी केलेल्या रेनी गुड आणि ॲलेक्स प्रेटी यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि ट्रम्प प्रशासनाच्या आक्रमक इमिग्रेशन धोरणांविरुद्ध रस्त्यावर उतरलेल्या मिनेसोटावासीयांच्या सन्मानार्थ त्यांनी हे गाणे लिहिले होते. स्प्रिंगस्टीन म्हणाले, “तुमच्या जिद्दीने हे सिद्ध केले आहे की ही अजूनही अमेरिकाच आहे आणि हे भयानक स्वप्न फारवेळ टिकणार नाही.”
“विदुषका, राजमुकुट खाली ठेव”
तर, वॉशिंग्टन डीसीमध्ये शेकडो लोकांनी लिंकन मेमोरिअलसमोरून नॅशनल मॉलपर्यंत मोर्चा काढला. त्यांच्या हातात “विदुषका, राजमुकुट खाली ठेव”, असं लिहिलेले फलक होते. तसंच राजा नको अशा घोषणाही त्यांनी दिल्या.
देशव्यापी आणि जागतिक प्रतिसाद
न्यूयॉर्क शहरापासून ते आयडाहोमधील ड्रिग्ससारख्या छोट्या शहरांपर्यंत ही निदर्शने पसरली. आयोजकांच्या मते, ५० राज्यांमध्ये ३,१०० हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सुमारे ९० लाख लोक यात सहभागी झाले असल्याचा अंदाज आहे.
वॉशिंग्टन: येथे शेकडो लोकांनी लिंकन मेमोरियलवरून नॅशनल मॉलपर्यंत मोर्चा काढला. “विदुषका राजमुकुट खाली ठेव” (“Put down the crown, clown) आणि “सत्तापालट घरातूनच सुरू होतो” (Regime change begins at home) अशा घोषणांचे फलक त्यांच्या हातात होते.
सॅन दिएगो: येथे सुमारे ४०,००० लोकांनी मोर्चा काढला.
आंतरराष्ट्रीय स्तरावर: लंडन, पॅरिस आणि रोममध्येही निदर्शने झाली. रोममध्ये हजारो लोकांनी पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या विरोधात आणि इराणवरील हल्ल्यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली.
सत्ताधारी पक्षाची टीका
व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या अबीगेल जॅक्सन यांनी या निदर्शनांना “डाव्या विचारसरणीच्या नेटवर्कचे उत्पादन” संबोधले आणि याला जनतेचा खरा पाठिंबा नसल्याचे म्हटले. नॅशनल रिपब्लिकन काँग्रेस कमिटीनेही याला “हेट अमेरिका रॅलीज” (अमेरिका द्वेषी रॅली) म्हणत टीका केली.
विविध मागण्या
प्रदर्शकांकडे मागण्यांची मोठी यादी होती. प्रामुख्याने इराणमधील युद्ध थांबवणे, ट्रम्प यांचे इमिग्रेशन धोरण आणि ट्रान्सजेंडर हक्कांची कपात या मुद्द्यांचा या यादीत समावेश होता. मिनेसोटा येथील मुख्य कार्यक्रमात स्प्रिंगस्टीन व्यतिरिक्त जोन बाएझ, जेन फोंडा आणि सिनेटर बर्नी सँडर्स यांसारख्या दिग्गज व्यक्तींनी सहभाग नोंदवला.
या आंदोलनामुळे अमेरिकेतील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, ट्रम्प प्रशासनाविरुद्धचा असंतोष स्पष्टपणे दिसून येत आहे.
