Donald Trump On US Iran Crisis : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी इराणबरोबर सुरू असलेल्या संघर्षाबद्दल माहिती दिली आहे. यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेची युद्धातील कामगिरी ही अपेक्षेपेक्षाही चांगली सुरू असल्याचे म्हटले आहे. इतकेच नाही तर त्यांनी अमेरिकेच्या कामगिरीला १० पैकी चक्क १५ रेटिंग दिले आहे. याबरोबरच इस्रायलबरोबर मिळून ही करावाई सुरूच ठेवली जाणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे.

व्हाईट हाऊसमध्ये टेक्नोलॉजी एक्झिक्युटीव्हजशी बोलताना ट्रम्प यांनी अमेरिका आणि त्याचे मित्रराष्ट्र हे या संघर्षात वरचढ ठरत असल्याचे स्पष्ट केले. “सौम्य शब्दांत सांगायचे झाल्यास, युद्धाच्या आघाडीवर आमची कामगिरी उत्तम सुरू आहे. कोणीतरी मला विचारले की, १० पैकी तुम्ही याला किती रेट कराल? मी म्हणालो, जवळपास १५,” असे ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी दावा केला की या संघर्षामध्ये इराणचे नेतृत्व संपवले जात आहे. “आम्ही सध्या अतिशय मजबूत स्थितीत आहोत आणि त्यांचे नेतृत्व वेगाने संपुष्टात येत आहे. नेतृत्व करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचा शेवट मृत्यूमध्ये होताना दिसून येत आहे,” असे ट्रम्प म्हणाले. इराणच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा साठा देखील वेगाने संपुष्टात येत असल्याचेही ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की इराणवरील हल्ल्याचा उद्देश हा अण्वस्त्र मिळवण्यापासून रोखणे हा आहे. “जेव्हा वेड्या लोकांकडे अण्वस्त्र असताता तेव्हा वाईट गोष्टी घडतात,” असे ट्रम्प यावेळी म्हणाले. तसेच बराक ओबामा यांच्या काळात झालेला अण्वस्त्र करार हा आताप्रर्यंतचा सर्वात वाईट करार होता असेही ट्रम्प म्हणाले.

संघर्षाचा पाचवा दिवस

मध्य पूर्वेत ठिकठिकाणी नव्यान स्फोट होत आहेत तसेच अमेरिकन सैन्याची इस्रायलबरोबर मिळून इराणविरोधातील संयुक्त मोहिमा सुरूच आहे, यादरम्यान अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी हे विधान केले आहे. या युद्धाचा आज पाचवा दिवस आहे.

या संघर्षादरम्यान अनेक नाट्यमय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. अमेरिकेच्या एका पाणबुडीने श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ इराणची युद्धनौका बुडवली. या घटनेमुळे या संघर्षाच्या काळात तणाव प्रचंड वाढला आहे. इराणची क्षेपणास्त्र क्षमता नष्ट करणे आणि त्यांच्या लष्करी पायाभूत सुविधांचे नुकसान करणे, हेच या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे पेंटागॉनने स्पष्ट केले आहे.