Donald Trump France Protests Statement Islam Controversy: फ्रान्समध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी, शिक्षक आणि पालक रस्त्यावर उतरले असून शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आंदोलन केले जात आहे. मात्र अनेक ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे दिसत आहे. यामुळे फ्रान्स सरकारला पोलीस बळाचा वापर करावा लागत आहे. दरम्यान फ्रान्समधील घडामोडींवर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठे भाष्य केले. अवैध स्थलांतराविरोधात आक्रमक भूमिका घेणाऱ्या ट्रम्प यांनी फ्रान्समधील अस्थिर परिस्थितीला अनियंत्रित स्थलांतरच कारणीभूत असल्याचे म्हटले आहे.

इस्लामला फ्रान्सवर ताबा मिळवायचा आहे

स्थलांतराविरोधात बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढे म्हटले की, हे आंदोलन शालेय शिक्षणाच्या मुद्द्यावर असल्याचे सांगितले जात असले तरी आंदोलनाच्या आडून इस्लामला फ्रान्सवर ताबा मिळवायचा आहे. ट्रुथ या सोशल मीडिया साईटवर ट्रम्प यांनी यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

“फ्रान्समध्ये जे काही घडत आहे, ते मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या अनियंत्रित स्थलांतराचे परिणाम आहेत. हे फक्त शाळांपुरते मर्यादीत नाही तर इस्लामला एकेकाळच्या महान देशावर ताबा मिळवायचा आहे”, असे ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे.

https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/117394656543560911

फ्रान्समध्ये आंदोलन का?

मंगळवारी (६ ऑक्टोबर) फ्रान्समध्ये विद्यार्थ्यांच्या बरोबरीने कामगार संघटनांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता. फ्रान्समधील शाळांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता, शाळांच्या इमारतींची दुर्दशा आणि अपुऱ्या सुविधांविरोधात विद्यार्थी आणि पालक आंदोलन करत आहेत. सप्टेंबरच्या अखेरीस छोट्या शहरांमधून सुरू झालेले हे आंदोलन मंगळवारी अधिक पेटले.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी देशभरात २,६६,००० लोक देशभरात रस्त्यावर उतरले होते. राजधानी पॅरिसमध्येही ठिकठिकाणी आंदोलन झाले. पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

मागच्या दोन आठवड्यांपासून विद्यार्थ्यांनी शाळांमध्ये जाणारे मार्ग रोखले आहेत. तसेच शाळेवर बहिष्कार घातला आहे. आंदोलन सुरू झाल्यापासून आतापर्यंत ६,५०० आंदोलकांना अटक झाली आहे. ज्यामध्ये अनेक अल्पवयीन मुलांचा समावेश आहे.

मध्यावधी निवडणुकींपूर्वी केलेल्या विधानाची चर्चा

अमेरिकेमध्ये पुढील महिन्यात मध्यावधी निवडणुका होत आहेत. रिपब्लिकन पक्षाने वारंवार अवैध स्थलांतराताचा मुद्दा लावून धरला होता. या निवडणुकीतदेखील पुराणमतवादी विचारांच्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी फ्रान्समधील हा मुद्दा वापरला जाण्याची शक्यता आहे. ट्रम्प यांनी सुरू केलेल्या मागा चळवळीनेही फ्रान्समधील विद्यार्थी आंदोलनाचा मुद्दा हाती घतेला आहे.