Donald Trump’s first reaction after White House Correspondents’ Dinner shooting : शनिवार रात्री ‘व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स असोसिएशन’च्या (WHCA) डिनर दरम्यान गोळीबाराच्या आवाजामुळे प्रचंड घबराट पसरली आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांना तातडीने बाहेर हलवण्यात आले. यावेळी शेकडो पाहुण्यांनी टेबलांखाली आश्रय घेतला, तर सिक्रेट सर्व्हिसच्या एजंट्सनी हातात शस्त्रे घेऊन संपूर्ण परिसराचा ताबा घेतला.
घटनेच्या सुमारे एक तासानंतर, ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर माहिती दिली की, “वॉशिंग्टन डी.सी. मधील ही एक मोठी संध्याकाळ होती. सिक्रेट सर्व्हिस आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी अप्रतिम काम केले. त्यांनी अतिशय जलद आणि धैर्याने पावले उचलली. शूटरला पकडण्यात आले आहे” दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी शो मस्ट गो ऑन म्हणत हा कार्यक्रम पुढे सुरू ठेवण्याची’ शिफारस केली होती, परंतु सुरक्षा यंत्रणांनी त्यांना नकार दिला, असंही ट्रम्प म्हणाले. ट्रम्प पुढे म्हणाले, “ही संध्याकाळ नियोजित वेळेपेक्षा खूप वेगळी होती आणि आपल्याला हा कार्यक्रम पुन्हा एकदा नव्याने करावाच लागेल.”

नेमबाज ताब्यात, नेत्यांना सुरक्षित बाहेर काढले
अमेरिकन सिक्रेट सर्व्हिसने ट्रम्प आणि प्रथम महिला सुरक्षित असल्याचं सांगितलं असून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हॅन्स, संरक्षण सचिव पीट हेगसेथ आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांच्यासह सर्व प्रमुख नेत्यांना खबरदारीचा उपाय म्हणून बाहेर काढण्यात आले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ‘वॉशिंग्टन हिल्टन’ हॉटेलच्या बॉलरूमबाहेर घडली. शॉटगन घेतलेल्या एका व्यक्तीने सुरक्षा कवच तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला आणि सिक्रेट सर्व्हिस एजंटवर गोळी झाडली. एफबीआय (FBI) अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, तो एजंट जखमी झालेला नाही.
हॉलमध्ये गोंधळ, बाहेर गोळीबाराचे आवाज
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, गोळीबाराचे ५ ते ८ आवाज आल्यानंतर हॉलमध्ये प्रचंड गोंधळ उडाला. “खाली झुका, खाली झुका!” अशा किंकाळ्या ऐकू आल्या आणि लोक टेबलांखाली लपले. बाहेर काढत असताना ट्रम्प यांचा पाय थोडा अडखळला, मात्र एजंट्सनी त्यांना त्वरित सावरले. साधारण २,६०० उपस्थितांमध्ये भीतीचे वातावरण होते, वेटिंग स्टाफ सैरावैरा धावत होता आणि हॉलमध्ये तुटलेल्या काचा व प्लेट्सचा खच पडला होता.
नॅशनल गार्ड आणि इतर सुरक्षा कर्मचारी मोठ्या संख्येने हॉटेलमध्ये दाखल झाले, तर हेलिकॉप्टर्सवरून परिसरावर नजर ठेवली जात होती. हॉटेलला छावणीचे स्वरूप आले होते.
सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
या घटनेमुळे या वार्षिक कार्यक्रमाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हा कार्यक्रम अशा हॉटेलमध्ये होता जे सर्वसामान्यांसाठी खुले असते, ज्यामुळे यापूर्वीही अनेकदा निदर्शने आणि अडथळे निर्माण झाले आहेत.
